सराफ दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न : गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : उत्तमनगर येथील सराफ दुकानात शिरून दुकानदाराला मारहाण करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे.
साईराज अतुल तावरे (रा. तुकाईनगर, वडगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. साईराज तावरे हा सराईत गुन्हेगार असून, जून २०२५ मध्ये नांदेड सिटी पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात त्याला साथीदारासह अटक करून दोन दुचाकी जप्त केल्या होत्या.
उत्तमनगर व शिवणे परिसरातील सराफ दुकानांमध्ये शिरून दुकानदाराला मारहाण करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पाठोपाठ दोन दुकानांमध्ये झाला होता. संदेश सुभाष नांगरे (वय २८, रा. कोंढवे-धावडे) यांचे उत्तमनगरमधील धावडे पेट्रोल पंपासमोर ‘मोरया ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे.
२८ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता ते दुकानात असताना मास्क घातलेले तिघेजण दुकानात शिरले. त्यांनी दुकानातील काऊंटरवरील काच फोडली. नांगरे यांनी विरोध केल्यावर त्यांच्यावर लोखंडी हत्याराने पोटावर वार केला.
नांगरे यांनी दुकानातील सेफ्टी स्टिकने प्रतिकार केल्यावर आरोपी मोटारसायकलवरून पळून गेले. पळून जाताना त्यांचा मास्क खाली पडल्याने नांगरे यांनी चोरट्यांचा चेहरा पाहिला होता. या गुन्ह्यातील चौघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. साईराज तावरे याचे नाव निष्पन्न झाले असले तरी तो फरार होता.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक १४ डिसेंबर रोजी आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत असताना पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील साईराज तावरे हा घरी आला आहे. या माहितीची खात्री करून पोलीस पथक त्याच्या घरी पोहोचले व साईराज तावरे याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, अमोल काटकर, किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे व तुषार किंद्रे यांनी केली.
















