पर्वती पोलिसांची बागुल उद्यानाजवळ पहाटेच्या सुमारास कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शरीराविरुद्ध गुन्ह्यांची नोंद असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी जेरबंद करून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
भिमराव नरसप्पा मानपाडे (वय २४, रा. साईनगर, गुलाबनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पर्वती पोलीस ठाण्याचे पथक कॉम्बिंग ऑपरेशन करीत असताना १३ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सद्दाम शेख आणि स्वप्निल घुगे यांना माहिती मिळाली की, बागुल उद्यानाजवळ एक इसम हुडी घालून संशयास्पदरीत्या थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे आणि तो कोणाची तरी वाट पाहत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा सुमारे ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक किरण पवार यांच्यासह पोलीस हवालदार प्रवि जगताप, कुलदीप शिंदे, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सद्दाम शेख, स्वप्निल घुगे, सूर्या जाधव, अमोल दबडे, किर्ती भोसले, राकेश सुर्वे, नानासाहेब खाडे, अमित चिव्हे व समीर जोशी यांनी केली आहे.















