नववर्ष व विविध कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांची अनोखी संकल्पना: केक मेकिंग कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी सूर्यदत्त हॉटेल मॅनेजमेंट एंटरप्रेन्योरशिप क्लबच्या वतीने ‘मेक द केक’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देत नागरिकांनाही व्यावसायिक केक बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात येणार आहे.
सूर्यदत्त हॉटेल मॅनेजमेंट एंटरप्रेन्योरशिप क्लबच्या विद्यार्थ्यांनी नववर्ष तसेच विविध कार्यक्रमांसाठी खास केक तयार करण्याचा हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत २४ आणि २९ डिसेंबर रोजी विशेष केक तयारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, भविष्यात मागणी व पूर्वनोंदणीच्या आधारे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना पूर्वनोंदणीद्वारे त्यांच्या पसंतीनुसार खास व अनोखा केक मागविता येणार आहे. येथे तयार होणारे केक ताज्या फळांपासून व नैसर्गिक फळांच्या रसापासून बनविले जाणार असून, ते चवदार आणि आरोग्यदायी असतील. उत्कृष्ट चव, पौष्टिकता आणि नावीन्य यांचा संगम असलेला ‘मेक द केक’ उपक्रम विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला चालना देणारा ठरत आहे.
या विशेष कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या प्राचार्या सौ. रसिका गुमास्ते यांच्याशी ९८२२९ १२४४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
हा उपक्रम सूर्यदत्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सौ. सुषमा चोरडिया आणि सहयोगी उपाध्यक्षा सौ. स्नेहल नवलखा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थींना केवळ केक बेकिंगची प्राथमिक माहिती न देता, केक बनवण्यामागील शास्त्रीय पद्धती आणि विविध घटकांच्या मिश्रणाचे सखोल ज्ञान अनुभवी पाककला तज्ज्ञांकडून दिले जाणार आहे.
कार्यशाळेत संत्र्याचा रस, काजू, बदाम, काळी मनुका, बेदाणे, टूटी फ्रूटी आणि ग्लेझ्ड चेरी यांसारख्या साहित्याचा वापर करून केकसाठी आवश्यक मॅरिनेशन कसे करावे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. व्यावसायिक स्तरावर केक बनवताना लागणारी कौशल्ये, संघभावना आणि सादरीकरणावरही विशेष भर दिला जाणार आहे.
बेकिंगची आवड असलेले, या क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे तसेच छंद म्हणून नवीन काही शिकू इच्छिणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी ही कार्यशाळा एक उत्तम संधी ठरणार आहे. पाककला तज्ज्ञ शेफ भास्कर वर्धी आणि संस्थेतील तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सूर्यदत्त हॉटेल मॅनेजमेंटने हा युनिक पुढाकार घेतला असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव, सॉफ्ट स्किल्स आणि उद्योजकीय दृष्टीकोन विकसित करण्याची संधी मिळत आहे. हा केक मेकिंग उपक्रम केवळ शैक्षणिक न राहता, समाजातील विविध घटकांना एकत्र आणून कौशल्य विकास व रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
















