वाघोली पोलिसांची धाड : २१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : थेऊर परिसरात एकाच ठिकाणी देशी, विदेशी व हातभट्टी अशा तिन्ही प्रकारच्या दारूची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले असून वाघोली पोलिसांनी धाड टाकून एकाला अटक केली आहे.
विदेशी दारूच्या किमती वाढत असल्याने बेकायदेशीररीत्या नदीकिनारी गुपचूप भट्टी लावून हातभट्टीची दारू गाळण्याचे प्रकार वाढले आहेत. हातभट्टीची दारू गाळणे व तिची विक्री करणे हा एक समांतर बेकायदेशीर व्यवसाय बनला आहे. अशाच प्रकारात थेऊर येथे एकाच छताखाली विदेशी, देशी व हातभट्टी अशा तिन्ही प्रकारच्या दारूची विक्री सुरू असल्याची माहिती वाघोली पोलिसांना मिळाली.
आप्पा कल्याण साळवे (वय ४७, रा. पत्रावस्ती, थेऊर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे. वाघोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार आव्हाळवाडी व मांजरी परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अशोक शेळके यांना थेऊरमधील व्हीटीपी रोडवर पत्र्याच्या शेडजवळ अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल व सहकाऱ्यांनी तेथे धाड टाकली असता आप्पा साळवे हा दारू विक्री करत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १६ हजार ८४० रुपयांच्या देशी व विदेशी दारूच्या २४४ बाटल्या तसेच ४ हजार ९०० रुपयांची गावठी हातभट्टी तयार दारूचे २४५ पाऊच, असा एकूण २१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तसेच पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रीतम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे व गहिनीनाथ बोयणे यांनी केली आहे.



















