आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बनावट मोबाईल अ‍ॅक्सेसरीजची विक्री करणाऱ्या ६ दुकानदारांवर गुन्हा दाखल

Spread the love

पुणे : अ‍ॅपल इंक या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या बनावट मोबाईल अ‍ॅक्सेसरीजची विक्री करणाऱ्या बुधवार पेठेतील ६ दुकानदारांवर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दुकानांतून १० लाख ३९ हजार ७०० रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत विजय यशवंत सागेलकर (वय ५०, रा. बांद्रा, मुंबई) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कसणाराम घिगाजी चौधरी (वय २५, रा. शीतलादेवी समोर, जैन मंदिराजवळ), मुकेश पुरीकरण पुरीगोस्वामी (वय २९, रा. कात्रज-कोंढवा रोड, कात्रज), मनिष करमीराम चौधरी (वय ३७, रा. पिंपळे सौदागर), जोगसिंग रुपसिंग राजपूत (वय ३५, रा. परमार अपार्टमेंट, रास्ता पेठ), हितेशकुमार माघाराम पुरोहित (वय २५, रा. शुक्रवार पेठ), राजेशचंद्र कृष्णचंद्र गोयल (वय ६०, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय सागेलकर हे अ‍ॅपल इंक कंपनीचे प्रतिनिधी आहेत. अ‍ॅपल कंपनीचे उत्पादन असलेल्या मोबाईल फोन तसेच मोबाईल चार्जर, मोबाईल कव्हर्स, इअरफोन, अ‍ॅडॉप्टर, इअरपॉड्स आदी साहित्यांची बनावटरीत्या हुबेहूब नक्कल करून त्यांची विक्री व साठा

करणाऱ्यांविरुद्ध कंपनीच्या वतीने कॉपीराइट कायद्याअंतर्गत पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येते. बनावट उत्पादने कशी ओळखावीत, याबाबत त्यांना कंपनीमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. बुधवार पेठेतील समर्थ प्लाझा बिल्डिंग व अ‍ॅडॉर्न बिझनेस सेंटर परिसरातील काही गाळ्यांमध्ये अ‍ॅपल कंपनीच्या मोबाईल अ‍ॅक्सेसरीजची हुबेहूब नक्कल करून त्यांची घाऊक व किरकोळ स्वरूपात विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक जाधव, हवालदार माने, रवींद्र पवार, चिवळे, पोलीस अंमलदार कुडाळकर, राजू शेख तसेच फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गोरे, पोलीस अंमलदार शिंदे, माने, कांबळे यांनी समर्थ प्लाझा बिल्डिंगमधील प्रेम टेलिकॉम, राज टेलिकॉम शॉप, ओम राजेश्वर शॉप, राज सेल्स येथे एकाचवेळी छापे टाकले.

या दुकानांतून अ‍ॅपल इंक कंपनीचे बनावट आयफोन बॅटरी, लोगो असलेले बॅक पॅनल, युएसबी अ‍ॅडॉप्टर, इअरपॉड्स, हेडफोन कनेक्टर, एअरपॉड्स, मोबाईल कव्हर्स जप्त करण्यात आले. तसेच अ‍ॅडॉर्न बिझनेस सेंटरमधील हिरा मोबाईल स्पेअर आणि गोयल मोबाईल या दुकानांवरही छापे टाकण्यात आले. या सर्व दुकानांतून एकूण १० लाख ३९ हजार ७०० रुपयांचा अ‍ॅपल इंक कंपनीचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे करीत आहेत.