ओंकार हिंगमिरे यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सोलापूर जिल्हा सचिवपदी निवड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : डिजिटल पत्रकारितेत अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ‘बार्शी लाईव्ह’चे कार्यकारी संपादक ओंकार हिंगमिरे यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या सोलापूर जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या बैठकीस ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेचे संस्थापक संदीप काळे, प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, दैनिक ‘तरुण भारत’चे संपादक प्रशांत माने यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आधुनिक पत्रकारितेला नवी दिशा देणारे ओंकार हिंगमिरे हे आजच्या तरुण पत्रकारांमध्ये एक ठळक नाव म्हणून ओळखले जातात. विशेषतः व्हिडीओ एडिटिंग, डिजिटल कंटेंट निर्मिती आणि सोशल मीडिया पत्रकारितेमध्ये त्यांचे विशेष कौशल्य असून, मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी कमी वयातच पत्रकारितेच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे.
राजकीय, सामाजिक तसेच व्यावसायिक क्षेत्रातील विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांशी असलेला त्यांचा सुसंवाद संघटनेसाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. परखड लेखनशैली, निर्भीड प्रश्न मांडण्याची क्षमता आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य ओंकार हिंगमिरे सातत्याने करत आहेत. बार्शी शहरासह परिसरातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी पत्रकार म्हणून ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारितेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.















