येवलेवाडी कमान येथील घटना : पोलिसांनी १२ तासांत आरोपींना केले जेरबंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पूर्ववैमनस्यातून पानटपरी चालक तरुणाच्या डोक्यात टोळक्याने दगड घालून त्याचा निर्घुण खून करण्यात आला. याप्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी १२ तासांत तिघा गुन्हेगारांना अटक केली आहे.
आदित्य सुभाष गायकवाड (वय १९, रा. गोकुळनगर, कोंढवा), गणेश किशोर मारे (वय २०, रा. कात्रज–कोंढवा), कौशल्य ऊर्फ ऋषी जनार्धन मारे (वय १९, रा. तुळजाभवानी निवास, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आकाश कृष्णा चाबुकस्वार (वय २१, रा. एकनाथपुरम सोसायटी, फुरसुंगी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. येवलेवाडी पोलिसांनी ७ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना येवलेवाडी कमानपुढील मिनू मेहता सोसायटीकडे जाणाऱ्या गल्लीमध्ये १ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.
आकाश चाबुकस्वार हा पूर्वी कोंढव्यातील लक्ष्मीनगर परिसरात राहत होता. गेल्या सहा महिन्यांपासून तो फुरसुंगी येथे राहत होता. तो व त्याचा भाऊ मिळून हांडेवाडी येथे पानटपरी चालवत होते.
आकाश चाबुकस्वार हा त्याचा मित्र व मैत्रीण यांच्यासह देवदर्शनासाठी गेला होता.
तेथून परत येत असताना आरोपींनी आकाशला पाहिले. जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद घालून सात जणांनी आकाशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. येवलेवाडी पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यातील तिघांना अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तसेच पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, सुषमा हिंगमिरे, संदीप पवार, गणेश चिंचकर, अभिजित जाधव, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, विजय खेगरे, अनिल बनकर, मयूर मोरे, अमोल तावरे, अक्षय शेंडगे यांनी केली आहे.















