लष्कर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माजी नगरसेवकासह चौघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गॅंगस्टर टिपू पठाण याच्यासोबत मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीने राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक व महापालिका निवडणुकीतील उमेदवार फारुक इनामदार याच्यावर आरोप करत गळफास घेऊन आत्महत्या केली.
सादिक हुसेन कपूर (वय ५७, रा. सय्यदनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी फारुक यासीन इनामदार (रा. सय्यदनगर, हडपसर), अफान फारुक इनामदार (रा. सय्यदनगर, हडपसर), जहूर महंमद सय्यद (रा. सय्यदनगर, हडपसर), तन्वीर इब्राहिम मणियार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारुक इनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार असून ते प्रभाग क्रमांक ४१ महंमदवाडी–उंड्री येथून महापालिका निवडणूक लढवत आहेत.
सादिक कपूर यांचा मुलगा साजिद सादिक कपूर (वय २७, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सय्यदनगर येथील गल्ली क्रमांक ५ व १७ ए येथील मालमत्तेच्या वादातून फारुक इनामदार व इतरांनी मिळून वारंवार ५० लाख रुपयांची मागणी करून सादिक कपूर यांना आर्थिक व मानसिक त्रास दिला आणि त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सादिक कपूर हे टिपू पठाण टोळीतील सदस्य असून त्यांच्यावर दोन गुन्ह्यांत मोक्का कारवाई करण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सादिक कपूर यांचा इस्ट स्ट्रीट येथील कुमार पॅलेस सोसायटीमध्ये गाळा असून तेथेच त्यांचे कार्यालय आहे. ते रिअल इस्टेट व्यवसाय करत होते. शनिवारी सायंकाळी सादिक कपूर यांनी याच कार्यालयात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मृत्युपूर्वी सुसाईड नोट लिहिली असून त्यात हडपसर भागातील प्रभाग क्रमांक ४१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी नगरसेवक फारुक इनामदार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
त्या सुसाईड नोटमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, फारुक इनामदार हे अजित पवार यांच्या नावाखाली गोरगरीबांच्या जमिनी हडप करण्याचे काम करत आहेत. त्यांनी अनेकांची घरे व कुटुंबे उद्ध्वस्त केली आहेत.
माझ्यासारख्या व्यवसायासोबत सामाजिक कार्य करणाऱ्या छोट्या कार्यकर्त्याला आज आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे. माझ्या जमिनीवर वृद्धाश्रम व रुग्णालय उभारण्याचा विचार असून त्यासाठी मी ट्रस्ट स्थापन केला आहे. मात्र, ही १० कोटी रुपयांची जमीन या माजी नगरसेवकाला हडप करायची आहे. हा माजी नगरसेवक टिपू पठाण याचा आका आहे.
मी शिंदे यांच्या शिवसेनेचे शाखाप्रमुखपद स्वीकारले होते; मात्र या माजी नगरसेवकाच्या त्रासामुळे कार्य अधिक जोमाने करता आले नाही. माझ्या छोट्याशा कार्यामुळे फारुक इनामदार यांना खूप त्रास झाला आहे.
त्यांनी माझा कायमचा काटा काढण्यासाठी कट रचून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना खरेदी करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले असून मला कायमचे संपवण्याचा प्लॅन केला आहे व पुढेही केसेस तयार ठेवल्या आहेत, असे या सुसाईड नोटमध्ये तसेच प्रशांत जगताप यांना पाठवलेल्या पत्रात नमूद आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर पुढील तपास करत आहेत.















