२० कोटींचे कर्ज देण्याचे आमिष : खडक पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : व्यवसायासाठी बँकेकडून २० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका व्यावसायिकाची ५१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मार्केटयार्ड परिसरातील ४१ वर्षीय व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आदित्य मोहन रेळेकर (वय ३४, रा. धनकवडे पाटील टाऊनशिप, बालाजीनगर, पुणे–सातारा रस्ता), करण विजय इजंतकर (वय ३२, रा. मेट्रो ग्रीन सोसायटी, टिळेकरनगर, कात्रज–कोंढवा रस्ता) आणि श्रीनिवास पांडुरंग बकरे (वय ४७, रा. गुलाबनगर, धनकवडी, मूळ रा. देवाळी, ता. माणगाव, जि. रायगड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १७ फेब्रुवारी २०२५ ते आतापर्यंत शुक्रवार पेठ परिसरात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शुक्रवार पेठेत हार्डवेअरचे होलसेल दुकान असून त्यांचे हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग युनिटही आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता होती. आरोपींची त्यांच्याशी गेल्या वर्षी ओळख झाली होती. खासगी संस्थांमार्फत व्यवसायासाठी २० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते.
कर्जासाठी लागणारे स्टॅम्प शुल्क व डिस्बर्समेंट चार्जेसच्या नावाखाली आरोपींनी वेळोवेळी फिर्यादीकडून एकूण ५१ लाख रुपये उकळले. मात्र, कर्ज न मिळाल्याने तसेच दिलेली रक्कम परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक व्हटकर करीत आहेत.















