महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे शहराचे तीन दशकांहून अधिक काळ नेतृत्व करणारे माजी खासदार सुरेश शामराव कलमाडी (वय ८२) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराला ‘क्रीडानगरी’ असा आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवून देण्यात सुरेश कलमाडी यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक क्षेत्रांत पुणे शहराचे नाव त्यांनी आंतरराष्ट्रीय नकाशावर कोरले. ‘सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी’ ही घोषणा त्या काळात पुण्यात लोकप्रिय झाली होती.
सुरेश कलमाडी हे गेले काही दिवस आजारी होते. मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव कलमाडी हाऊस येथे दुपारी दोन वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
सुरेश कलमाडी यांचा जन्म १ मे १९४४ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूल येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून भरती होऊन पाकिस्तानविरुद्धच्या १९६५ आणि १९७१ च्या युद्धात भाग घेतला होता. हवाई दलात असताना मिझोराम येथील बंड मोडीत काढण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईत त्यांनी बॉम्बवर्षावात सहभाग घेतला होता. त्यानंतर मिझोराम भारतातील एक संघराज्य बनले. पुढे ते फ्लाइट लेफ्टनंट म्हणून सेवानिवृत्त झाले.
सुरेश कलमाडी हे दिल्लीत शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून सुरुवातीला ओळखले जात. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दिल्लीत सुरेश कलमाडी यांनी त्यांच्यासाठी मोठे समर्थन गोळा केले होते.
सुरेश कलमाडी यांनी राज्यसभा आणि लोकसभेत पाच वेळा प्रतिनिधित्व केले. राजकीय कारणांमुळे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुणे विकास आघाडी स्थापन केली. या विकास आघाडीने पुणे महापालिकेत सत्ता मिळवली. तो ‘पुणे पॅटर्न’ म्हणून देशभर गाजला होता. त्याचवेळी ‘सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी’ ही घोषणा पुणे शहरात लोकप्रिय झाली होती.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी देशपातळीवर क्रीडा क्षेत्रात भरीव काम केले. दिल्लीत आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे त्यांना अटक झाली होती, त्यानंतर ते राजकीय विजनवासात गेले. या प्रकरणातून त्यांना नुकतीच क्लीनचिट मिळाली होती. सुरेश कलमाडी यांनी पुणे शहराचे देशपातळीवर जवळपास तीन दशके नेतृत्व केले.
सुरेश कलमाडी यांचे पुणे शहरासाठीचे योगदान
– केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असताना मध्य रेल्वे अंतर्गत पुणे विभाग सुरू केला.
– पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा सुरू करून पुणे शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर नेले.
– पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल सुरू करून मनोरंजन क्षेत्रात पुणे शहराला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली.
– बालेवाडी येथे भव्य क्रीडानगरी उभारण्यात सिंहाचा वाटा.
– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी जागतिक दर्जाची बीआरटी योजना पुण्यात प्रथम सुरू केली; पुढे राजकीय विरोधामुळे ही योजना पुण्यात अयशस्वी ठरली.
– देशात प्रथमच चौक अधिक प्रकाशमान करणारे हॉल मॅक्स दिवे पुण्यात बसवले.
– लोहगाव विमानतळ ते बालेवाडी स्टेडियम हा पहिला सिमेंटचा रस्ता त्यांच्या पुढाकाराने झाला.
– पुणे शहरातील विकासकामांमध्ये त्यांच्या काळात भरीव वाढ झाली.
– सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात प्रथमच अनेक महिलांना महापौरपद मिळाले.















