गुन्हे शाखेने २४ तासांत गुन्हा आणला उघडकीस, २२४ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेवाळवाडी येथील सराफी दुकानावर दरोडा टाकून ५२ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांना गुन्हे शाखेच्या युनिट ५ व ६ पथके तसेच दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाने २४ तासांच्या आत अटक केली. चोरट्यांकडून २२४ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच १८३ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
प्रवीण महादेव शिंदे (वय १८, रा. कानिफनाथनगर, फुरसुंगी, हडपसर), राजदीप संतोष जगताप (वय २१, रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता), भावेश राजेश चव्हाण (वय २०, रा. रवीदर्शन, उन्नतीनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी येथे महावीर ज्वेलर्स या सराफी दुकानात ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चोरटे शिरले. त्यांनी दुकानदाराला शस्त्रांचा धाक दाखवून काऊंटरची काच फोडली. दुकानातील डिस्प्ले बोर्ड व कपाटातील एकूण ५२८ ग्रॅम वजनाचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले होते.
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांकडून केला जात होता. मांजरी, लोणी काळभोर, हडपसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात होता.
द्राक्ष संशोधन केंद्राजवळ ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता तिघे संशयित मिळून आले. प्रविण शिंदे, भावेश चव्हाण व एका अल्पवयीन मुलाकडे केलेल्या तपासात राजदीप जगताप व इतर तीन अल्पवयीन मुलांसह दरोडा टाकण्यात आल्याची माहिती पुढे आली. त्यांचा शोध घेतला असता ते छत्रपती संभाजीनगर येथे गेल्याची माहिती मिळाली.
यानंतर युनिट ५ चे पोलीस अधिकारी अभिजित पवार व पोलीस अंमलदार तात्काळ तेथे रवाना झाले. त्यांनी दोन अल्पवयीन मुलांसह राजदीप जगताप यांना पकडले. या अल्पवयीन मुलांकडून एकूण २२४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १८३ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तीन आरोपी व तीन अल्पवयीन मुलांना पुढील कारवाईसाठी मांजरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, सहायक पोलीस निरीक्षक सी. बी. बेरड, मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक एस. जे. तानवडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस अंमलदार राजेश लोखंडे, राजू पुणेकर, संतोष होले, परेश सावंत, राहुल इंगळे, संदीप येळे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर, प्रफुल्ल मोरे, अमित कांबळे, अकबर शेख, गणेश माने, राहुल ढमढरे, जहांगीर पठाण, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, विशाल इथापे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली आहे.















