माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार
बार्शी : नगराध्यक्ष नव्हे तर जनतेची सेवक म्हणून कार्यरत राहून, राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर सुजलाम–सुफलाम करण्यासाठी यापुढेही कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही नूतन नगराध्यक्ष तेजस्विनी कथले यांनी दिली.
सोमवारी सकाळी नगराध्यक्षांच्या दालनात दीपप्रज्वलन करून मंत्रोच्चारात नगराध्यक्षपदाच्या खुर्चीची विधिवत पूजा करत कथले यांनी पदभार स्वीकारला. यावेळी शशी चंद्रशेखर, प्रमोद चंद्रशेखर व चंद्रशेखर समाजातील गुरुजींनी पौरोहित्य केले.
कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र राऊत, कविता राऊत, माजी नगराध्यक्ष ॲड. असिफ तांबोळी, रमेश पाटील, बाबासाहेब कथले, प्रशांत कथले व महेंद्र कथले, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.
बार्शी नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांनी नूतन नगराध्यक्षांचा रोप व भेटवस्तू देऊन सत्कार केला, तर कविता राऊत यांनी पेडा भरवून अभिनंदन केले. यावेळी राजेंद्र राऊत म्हणाले, “बार्शीकर नागरिकांनी लाडकी बहीण तेजस्विनी कथले यांना भरघोस मतांनी विजयी केले आहे.
जनतेच्या या आशीर्वादामुळे केंद्र व राज्य शासनाचा निधी कमी पडू देणार नाही. नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ यशस्वी व तेजस्वी ठरेल, याबाबत कोणतीही शंका नाही. एक भाऊ म्हणून निधीची कमतरता भासू न देता बार्शीच्या विकासाला अधिक गती देऊ.”
पदभार स्वीकारल्यानंतर नगरपरिषदेच्या प्रांगणात महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा फेटा बांधून व रोप देऊन विविध खातेप्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना शहराध्यक्ष विजय माने, भाजपा शहराध्यक्ष महावीर कदम तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
पदभार स्वीकारण्यापूर्वी शहरातील ऐनापुर मारुती मंदिरात पूजा करून नूतन नगराध्यक्षांची शहरातील प्रमुख मार्गांवरून सूर–सनई–चौघड्यांच्या गजरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत माजी आमदार राऊत यांच्यासह कथले परिवारातील सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शिवसृष्टी येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या प्रवेशद्वारातून मंगलवाद्यांच्या गजरात नगराध्यक्षांनी नगरपरिषदेच्या पायरीवर दर्शन घेत प्रवेश केला.
नगराध्यक्षांचे दालन आकर्षक रंगोटी व फुलांनी सुशोभित करण्यात आले होते. कॅबिनमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या.















