ड्रायव्हरच निघाला अपहरणकर्त्यांचा साथीदार; ऊरुळी कांचन पोलिसांनी चौघांना केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कारमधून जात असलेल्या डॉक्टरांसह तिघांचे अपहरण करून १९ लाखांची खंडणी उकळण्यात आली होती. ऊरुळी कांचन पोलिसांनी अपहरण करणाऱ्या चौघांना अटक करून त्यांच्याकडून कार आणि खंडणीतील रक्कम असा १५ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. डॉक्टरांचा ड्रायव्हरच अपहरणकर्त्यांचा साथीदार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
राजेंद्र छगन राजगुरु (वय ३२, रा. अनंतपूर, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), संतोष सोमनाथ बनकर (वय ३६, रा. अनंतपूर, पैठण), दत्ता ऊर्फ गोटू बाळु आहेर (वय ३४, रा. अनंतपूर, पैठण) आणि सुनील ऊर्फ सोनू मुरलीधर मगर (वय ३०, रा. गणेशनगर, गारखेडा परिसर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
डॉ. विठ्ठल किसन चौधरी (वय ५८, रा. कुंजीरवाडी) हे १० जानेवारी रोजी रात्री सव्वादहा वाजता सोलापूर–पुणे महामार्गावरून ऊरुळी कांचनकडून कुंजीरवाडीकडे कारमधून जात होते. त्यावेळी राजेंद्र छगन राजगुरु हा गाडी चालवत होता.
इनामदार वस्ती येथे डॉक्टरांच्या कारला पांढऱ्या रंगाची एरटीगा कार आडवी मारण्यात आली. डॉक्टरांची कार थांबवून चार जण त्यांच्या कारमध्ये बसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.
डॉक्टरांचे अपहरण करून त्यांना पुन्हा ऊरुळी कांचन येथून शिंदवणे बाजूकडे घेऊन गेले. डॉक्टरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ४ लाख रुपयांची खंडणी घेतली व डॉक्टरांना चौफुला येथे सोडून देत आणखी १५ लाख रुपयांची खंडणी मागितली.
भीतीपोटी डॉक्टरांनी १२ जानेवारी रोजी १५ लाख रुपये दिले. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले.
स्थानिक गुन्हे शाखा व ऊरुळी कांचन पोलिसांची अशी दोन पथके तयार करण्यात आली. फिर्यादी व साक्षीदारांकडे तपास करत असताना डॉक्टरांच्या ड्रायव्हरवर संशय बळावला. राजेंद्र राजगुरु हा २ ते ३ वर्षांपूर्वी डॉक्टरांकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता.
त्यानंतर तो पुन्हा त्यांच्या कडे काम करू लागला होता. त्याचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर तो आरोपींशी पूर्वीपासून संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने साथीदारांच्या मदतीने डॉक्टरांचे अपहरण करून खंडणी घेतल्याची कबुली दिली.
त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य तिघांना अटक केली. हे तिघे मोलमजुरी करणारे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एरटीगा कार आणि खंडणीची रक्कम ७ लाख ८० हजार रुपये असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. सुनील मगर याच्यावर यापूर्वी मालमत्ता चोरीचे तीन गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे अधिक तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, आसिफ शेख, राजू मोमीन, योगेश नागरगोजे, धीरज जाधव, अजित काळे, प्रविण चौधर, निलेश जाधव, प्रशांत पवार, विशाल रासकर, सुमित वाघ, दीपक यादव, अमोल राऊत यांनी केली आहे.
















