मांजरीतील घटना, रेकॉर्डवरील अल्पवयीन मुलाकडून चार मोबाईल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मांजरी भागातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहणाऱ्या बांधकाम मजुराचा मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा अल्पवयीन मुलगा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चार मोबाईल जप्त केले आहेत.
याबाबत अरविंदकुमार (वय २२, सध्या रा. मांजरी खुर्द, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंदकुमार हा बांधकाम मजूर असून तो मांजरी परिसरातील एका गृहप्रकल्पावर राहतो.
सोमवारी, १९ जानेवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास अल्पवयीन मुलगा गृहप्रकल्पाच्या आवारात शिरला. आवारातील एका खोलीत अरविंदकुमार व त्याचा भाऊ झोपले होते. अरविंदकुमार पहाटे चारच्या सुमारास स्वच्छतागृहात गेला होता. त्याने खोलीचा दरवाजा बाहेरून लावला होता. त्याच वेळी खोलीचा दरवाजा उघडून अल्पवयीन आत शिरला.
काही वेळानंतर अरविंदकुमार तेथे परत आला असता खोलीत कोणीतरी शिरल्याचे त्याच्या लक्षात आले. अरविंदकुमार व त्याच्या भावाने अल्पवयीन मुलाला पकडले. त्यानंतर अल्पवयीनाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चार मोबाईल सापडले. हे मोबाईल त्याने या लेबर कॅम्पमधून चोरल्याची कबुली दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार पुढील तपास करीत आहेत.
















