काही मिनिटात दीड लाखांचा आभासी नफ्यावर विश्वास ठेवून केली गुंतवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला ५ लाख रुपये गुंतविल्यानंतर काही मिनिटांत दीड लाख रुपयांचा आभासी नफा दाखवण्यात आल्याने त्यांनी यावर विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक केली.
याबाबत संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी मूळचे गुरुग्राम येथील असून सध्या मगरपट्टा सिटी परिसरात आपल्या मुलगा व सुनेसोबत राहत आहेत. ते इंडस्ट्रियल मशीन टेक्निकल कन्सल्टन्सी क्षेत्रातून निवृत्त झाले आहेत.
ऑक्टोबर महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. सुरुवातीला त्यांनी ५ लाख रुपये गुंतविले. नंतर रजिस्ट्रेशन केलेल्या खात्यात ६ लाख ५० हजार रुपये नफ्यासह दिसू लागले. “हे पैसे तुमचेच असून दुसरे कोणी पाहू शकत नाही,” असे सांगून चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला.
२७ नोव्हेंबर ते २४ डिसेंबरदरम्यान फिर्यादींनी स्वतःच्या व पत्नीच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या सहा वेगवेगळ्या बँक खात्यांत एकूण २२ कोटी ३ लाख २२ हजार ७४२ रुपये गुंतविले. त्यांच्या खात्यावर प्रॉफिटसह ४५ कोटी रुपये दिसत होते. मात्र पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर खाते ब्लॉक झाले. त्यानंतर “टॅक्स भरण्यासाठी आणखी ४ कोटी रुपये लागतील,” असे सांगण्यात आले.
१७ जानेवारीनंतर लॉगिनही बंद झाल्याने आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.
















