कोथरुडमधील घटनेचा गणेश विसर्जनाच्या दिवशी रचला होता कट
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोथरुड परिसरात आपल्या टोळीची दहशत कमी झाल्याने वर्चस्व वाढवण्यासाठी हमराज चौक व शास्त्रीनगर परिसरात जोरदार धमाका करण्याचा कट गँगस्टर नीलेश घायवळ याने गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी, ६ सप्टेंबर २०२५ रोजी रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. “वेपन आणि पैसे मी पुरवतो, केस लागली तर बाहेर काढतो,” असे सांगून त्याने हा कट रचल्याचे उघड झाले आहे.
यानंतर १७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मुठेश्वर मित्र मंडळ चौकाजवळ गप्पा मारत उभ्या असलेल्या नागरिकांवर घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. घायवळ टोळीतील ९ गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे शाखेने ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत : मयूर उर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय २९), मयंक उर्फ मॉन्टी विजय व्यास (वय २९), गणेश सतीश राऊत (वय ३२), दिनेश राम फाटक (वय २८), आनंद अनिल चांदलेकर (वय २४), मुसाब इलाही शेख (वय ३३), जयेश कृष्णा वाघ (वय ३६), अक्षय दिलीप गोगावळे (वय २९) आणि अजय महादेव सरोदे (वय ३२) (सर्व रा. कोथरुड परिसर).
या गुन्ह्यानंतर काही दिवसांत गँगस्टर नीलेश घायवळ परदेशात पळून गेल्याचे उघड झाले असून त्याला अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात आली आहे. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.
तपासात निष्पन्न झाले की, ६ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी नीलेश घायवळने आरोपींसोबत बैठक घेत कोथरुडमध्ये दहशत निर्माण करण्याचा कट रचला होता. या कटाच्या अंमलबजावणीसाठी त्याने वेपन व आर्थिक सहाय्य पुरवले होते. आरोपींनी हा गुन्हा संघटितपणे आर्थिक फायद्यासाठी केल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे २५ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
या गुन्ह्यात वापरलेले १ पिस्टल, १ रिकामी पुंगळी, तसेच घायवळच्या घरझडतीमध्ये २ जिवंत काडतुसे व ४ रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात ९ जणांना अटक करण्यात आली असून ८ आरोपी फरार आहेत. न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले आहे.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक माळेगाव, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, विशाल चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार सुनील राऊत, संतोष डोळस, नितीन काळे व उत्तेकर यांनी केली.
नीलेश घायवळच्या दोन बेकायदेशीर इमारती
नीलेश घायवळ व सचिन घायवळ यांनी कोथरुड परिसरात दोन बेकायदेशीर इमारती उभारल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही जागा बेकायदेशीररीत्या बळकावून त्यात भाडेकरू ठेवण्यात आले असून, त्यांच्या हस्तकांमार्फत भाडेवसुली केली जाते. या इमारतींवर कारवाई करण्यासाठी पुणे महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एकूण १२२ साक्षीदार तपासले असून ६ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. अटक केलेल्या ९ आरोपींविरुद्ध १२ जानेवारी रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
















