सायबर पोलिसांचे यश : फसवणुकीची रक्कम तब्बल ५ हजार ४३६ बँक खात्यात ट्रॉन्सफर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १० कोटी ७४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखी एका आरोपीला सोलापूरमधून अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. या फसवणुकीतील रक्कम तब्बल ५ हजार ४३६ विविध बँक खात्यांमध्ये फिरविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
अमर शिवाजी अत्तरंगी (रा. मोदीखाना, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी हर्षद सुभाष धनतोले (रा. कर्वेनगर) आणि समर्थ सुरेश देशमुख (वय २४, रा. कर्वेनगर) यांना २२ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.
फिर्यादी असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला २३ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपींनी फोन करून नरेश गोयल याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात तुमच्या नावाने कॅनरा बँकेत बनावट खाते उघडले गेले आहे, असे सांगितले. तसेच डिजिटल अरेस्टची भीती दाखवून त्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडून १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये भरायला लावून फसवणूक केली.
फिर्यादी यांनी ३० जानेवारी २०२६ रोजी ७५ लाख रुपये येस बँकेच्या खात्यावर जमा केले होते. या खात्यावरून पुढे महाराष्ट्र बँकेच्या तीन वेगवेगळ्या खात्यांवर एकूण ६ लाख ५० हजार रुपये पाठविण्यात आले होते.
सायबर क्राइम पोर्टलवर प्राप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी हर्षद धनतोले आणि समर्थ देशमुख यांना अटक केली. चौकशीत धनतोले याने एटीएममधून काढलेली रक्कम रोहन जाधव (रा. सांगवी) याला दिल्याची माहिती दिली होती. या दोन्ही आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यांद्वारे एकूण २९ फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
रोहन जाधवचा शोध घेत असताना त्याचे अमर अत्तरंगी याच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे समोर आले. फिर्यादींकडून फसवणुकीच्या रकमेपैकी ५ लाख रुपये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पाठविण्यात आले होते. त्यानंतर हे पैसे चेकद्वारे काढण्यात आल्याचे तपासात दिसून आले. हे खाते अमर अत्तरंगीच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर ५ मार्च रोजी पोलिसांचे पथक सोलापूरला रवाना करण्यात आले. मोदीखाना परिसरातून अमर अत्तरंगी याला पकडून ६ मार्च रोजी अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत महाराष्ट्रातील आणखी एक फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
या प्रकरणातील १० कोटी ७४ लाख रुपयांपैकी आतापर्यंत १ कोटी ३४ लाख रुपये गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगिता देवकाते, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, तसेच पोलीस कर्मचारी भडेकर, साळवे, भोसले, राठोड आणि मांढरे यांनी केली.















