बार्शीतील झालटे कुटुंबाची शहर, राज्य आणि राष्ट्र सुरक्षेतील अद्वितीय शौर्यगाथा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : सोलापूर जिल्यातील बार्शी शहरातील संभाजीनगर, राऊत चाळ येथे वास्तव्यास असलेले, मूळ पुरी (ता. बार्शी) येथील झालटे कुटुंब आज केवळ बार्शीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचे प्रतीक ठरत आहे. मात्र हा गौरव एका रात्रीत मिळालेला नसून, त्यामागे आई-वडिलांचा संघर्ष, अपार कष्ट आणि संस्कारांची शिदोरी दडलेली आहे.
कुटुंबप्रमुख अंकुश भीमराव झालटे यांनी आयुष्यभर ट्रक चालक म्हणून कठोर परिश्रम करत कुटुंबाचा गाडा चालवला. ऊन, पाऊस, थंडी, दिवस-रात्र रस्त्यावर काढत त्यांनी आपल्या मुलांचे भविष्य घडवले.
आज वय व आरोग्यामुळे ते घरी विश्रांती घेत असले तरी त्यांच्या मेहनतीच्या चाकांवरच मुलांचे यश उभे आहे. त्यांच्या पत्नी पुष्पा अंकुश झालटे यांनी संसाराची जबाबदारी सांभाळत कारखान्यात मजुरीचे काम करून मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला.
आई-वडिलांच्या घामाचे थेंबच आज देशसेवेतील शौर्यात रूपांतरित झाले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.या संस्कारांतून घडलेले तीनही सुपुत्र आज देशाच्या सुरक्षेसाठी समर्पित आहेत ही बाब अत्यंत दुर्मिळ आणि गौरवास्पद आहे.
कुटुंबातील ज्येष्ठ सुपुत्र गोविंद (सुहास) झालटे हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत तुर्भे पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असून शहरी भागातील कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ते सदैव सज्ज असतात.
द्वितीय सुपुत्र मुकुंद झालटे हे CRPF च्या अत्यंत धाडसी CoBRA बटालियनचे कमांडो असून सध्या छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागात प्राणपणाने देशसेवेचे कर्तव्य बजावत आहेत. 2020 साली नागरोटा टोलनाका येथे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तीन दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या निर्णायक कारवाईत त्यांनी दाखवलेले शौर्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरले.
या पराक्रमाची दखल घेत बार्शी शहरातील नागरिक व मित्रपरिवाराच्या वतीने कमांडो मुकुंद झालटे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. तृतीय सुपुत्र कैलास झालटे हे महाराष्ट्र पोलीस दलाच्या SRPF बलगट क्रमांक ५, दौंड येथे सेवेत असून दंगल नियंत्रण, निवडणूक बंदोबस्त, आपत्ती व्यवस्थापन व विशेष सुरक्षेच्या जबाबदाऱ्या ते समर्थपणे पार पाडत आहेत.
एकाच कुटुंबातील तिन्ही सुपुत्र शहर सुरक्षा, राज्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा या तिन्ही स्तरांवर कार्यरत असणे हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे. ट्रक चालवणाऱ्या वडिलांचे स्वप्न, कारखान्यात राबणाऱ्या आईचा त्याग आणि मुलांच्या कठोर मेहनतीचे यशस्वी फळ म्हणजे झालटे कुटुंब होय.
संभाजीनगर-राऊत चाळ, बार्शी शहर, पुरी गाव, बार्शी तालुका, सोलापूर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही शौर्यगाथा प्रत्येक पालक, प्रत्येक तरुण आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी ठरत आहे. अशी कुटुंबेच देशाची खरी ताकद असल्याची प्रचीती या घटनेतून येते.
















