काशेवाडीतील घटना, फ्लेक्स लावण्यावरून झाला वाद, परस्परविरोधी तक्रारी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दोघीही एकाच भाजपमधील, एकाच प्रभागातील उमेदवार. महापालिका निवडणुकीत त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र प्रचार केला होता. दोघीही निवडून आल्या. त्यानंतर आता गणेश जयंतीला फ्लेक्स लावण्यावरून या दोन्ही नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. खडक पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
प्रभाग क्रमांक २२, कासेवाडी–डायस प्लॉट येथून भाजपच्या मृणाल कांबळे आणि अर्चना पाटील या निवडून आल्या आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली. ही घटना काशेवाडीतील सुदर्शन चौकात २२ जानेवारी रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेदरम्यान घडली.
याबाबत सतीश भिमराव साठे (वय ४३, रा. राजीव गांधी हौसिंग सोसायटी, काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शंतनु कांबळे, वैभव कांबळे, दादा मांढरे व अन्य दोघांवर गर्दी जमवून मारामारी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम असल्याने मंदिरासमोर आरोपी बॅनर लावत होते. या बॅनरमुळे वाहतुकीस अडथळा होईल, म्हणून सतीश साठे यांनी मंदिरासमोर बॅनर लावण्यास विरोध केला.
याचा राग मनात धरून आरोपींनी सतीश साठे व युवराज अडसूळ यांना शिवीगाळ केली. बॅनर बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी हत्यार, लाकडी बांबू व लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले, अशी फिर्याद तुषार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे तपास करीत आहेत.
त्याविरोधात नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ शंतनु पांडुरंग ऊर्फ बापू कांबळे (वय ३०, रा. एस.आर.ए. बिल्डिंग, लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी युवराज अडसूळ, अक्षय अडसूळ, सतीश साठे, विक्रम खेनट (सर्व रा. काशेवाडी), प्रविण फैजी, राहुल मोहिते (रा. लोहियानगर) व अन्य ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार काशेवाडी येथील अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या शेजारी, तुषार पाटील यांच्या पाटील चौकात २२ जानेवारी रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेदरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणाल कांबळे यांचा फोटो असलेला फ्लेक्स व बॅनर लावत असताना तुषार पाटील यांचे कार्यकर्ते व त्यांच्या सोबत असलेल्या ७ ते ८ जणांनी बॅनर लावण्याच्या कारणावरून बापू कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
हाताने पोटात व तोंडावर मारहाण करण्यात आली. सतीश साठे याने बॅनर लावू नये, म्हणून बापू कांबळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करीत आहेत.
















