चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी : संरक्षणासाठी बाळगले होते पिस्टल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ठेकेदारीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीस चतु:श्रृंगी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
रोहित ढाक्या मेघावत (वय २४, रा. संजय गांधी वसाहत, लमाण तांडा, गणपती मंदिराशेजारी, पाषाण) असे आरोपीचे नाव आहे. रोहित मेघावत हा ठेकेदारी व्यवसाय करतो. व्यवसायातून आपल्यावर कोणी हल्ला करू शकतो, या भीतीपोटी त्याने संरक्षणासाठी पिस्टल बाळगल्याचे सांगितले आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार इरफान मोमीन यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पाषाण येथील मनपा कोठी चौकात २६ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना पाषाण येथील मनपा कोठी चौकात एका व्यक्तीकडे शस्त्र असल्याची माहिती मिळाली.
माहितीची खात्री करून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रोहित मेघावत याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व २ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल आढळून आला.
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे अधिक तपास करीत आहेत.















