कौटुंबिक कारणावरून कृत्य, १३ वर्षांच्या मुलीवर चाकूने वार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वाघोली परिसरात आईने ११ वर्षांच्या मुलाचा चाकूने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच आईने १३ वर्षांच्या मुलीवरही चाकूने वार केला आहे. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कौटुंबिक वादातून आईने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
साईराज संतोष जायभाय (वय ११) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी सोनी संतोष जायभाय (वय ३०) हिला अटक करण्यात आली आहे. सोनी हिने १३ वर्षीय मुलगी धनश्री हिच्यावर चाकूने वार केला. या घटनेत धनश्री गंभीर जखमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी जायभाय मूळची नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील रहिवासी आहे. जायभाय कुटुंबीय गेल्या ५ ते ६ वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत. सध्या ते वाघोलीतील बायफ रस्त्यावर राहतात. जायभाय पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असत. संतोष जायभाय हे मजुरीचे काम करतात.
आज सकाळी संतोष जायभाय घरातून निघून गेल्यानंतर सोनी जायभाय हिने आपल्या ११ वर्षांच्या मुलगा साईराज याच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याचा खून केला. हे पाहून धनश्री हिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा आईने तिच्यावरही चाकूने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला.
धनश्रीचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहिले असता सोनी जायभाय घरात बसलेली होती आणि तिच्या हातात चाकू होता. साईराज व धनश्री हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी तातडीने त्यांना लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान साईराज याचा मृत्यू झाला.
कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याचे सोनी हिने पोलिसांना सांगितले असून वाघोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.















