उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात निधन
पुणे : साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राजकारणात आलेले आणि आपले काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (वय ६६) यांचे आज बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. महाराष्ट्र एका कर्तृत्ववान नेत्याला मुकला आहे. बारामतीच्या विकासासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. देशातील एक आघाडीचा तालुका म्हणून बारामतीला त्यांनी नावारूपाला आणले. त्याच बारामतीमध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
अजित आशाताई अनंतरराव पवार यांचा जन्म प्रवरा देवळाली येथे २२ जुलै १९५९ रोजी झाला. आपले काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवार यांनी १९८२ मध्ये साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवले. ते साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून १९९१ मध्ये ते निवडून आले. पुढील १६ वर्षे ते पीडीसीसीचे अध्यक्ष होते.
१९९१ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते. शरद पवार हे पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले. तेव्हा त्यांच्यासाठी अजित पवार यांनी लोकसभेचा राजीनामा दिला.
त्यानंतर ते शरद पवार यांच्या जागी बारामती विधानसभा मतदारसंघातून सर्वप्रथम पोटनिवडणुकीत १९९१ मध्ये विजयी झाले. त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २०१४, २०१९ आणि २०२५ अशी सलग सात वेळा ते बारामती मतदारसंघातून निवडून गेले होते.
त्यांनी १९९१ ते १९९२ या काळात मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम केले. १९९२ मध्ये जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते मृद्संधारण, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री झाले.
१९९९ मध्ये काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ते पाटबंधारे विभागाचे कॅबिनेट मंत्री झाले. २००३ मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना अतिरिक्तपणे ग्रामविकास विभागाची जबाबदारी देण्यात आली.
२००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने विजय मिळवल्यानंतर त्यांनी विलासराव देशमुख आणि नंतर अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्रालय कायम ठेवले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात असताना, सप्टेंबर २०१२ मध्ये प्रशासकीय अधिकारी विजय पांढरे यांनी जलसंपदा विभागात ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला.
त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करूनही राज्यातील सिंचन क्षमता १ टक्क्यानेही वाढली नसल्याचे सांगितले. तेव्हापासून अजित पवार यांच्यामागे ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप लागला. त्यातून त्यांची राजकीय कारकीर्द शेवटपर्यंत काळवंडली.
२०१९ मध्ये त्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटून भाजपबरोबर युती करून पहाटेचा शपथविधी केला. मात्र त्यांचे बंड दोन दिवसही टिकले नाही. ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या सर्वाधिक होती.
त्यामुळे नंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खाते देण्यात आले. कोरोना काळात त्यांनी आपल्या कर्तबगारीने राज्याला आर्थिक संकटातून वर काढले.
२०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर ते विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर २०२३ मध्ये त्यांनी शरद पवार यांना सोडून भाजपबरोबर युती केली आणि ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी त्यांनी राज्यभर फिरून जोरदार प्रचार केला. त्यातून आपल्या एकट्याच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० हून अधिक आमदार निवडून आणले.
पहाटे लवकर उठून कामाला सुरुवात करणे ही त्यांची सवय होती. त्यांनी स्वतःबरोबरच शासकीय अधिकारी व कार्यकर्त्यांनाही सकाळी लवकर उठून कामाला लागण्याची सवय लावली. त्यांच्या कामाचा झपाटा विलक्षण होता. आपले पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन घोटाळा नुकताच उघडकीस आला होता; तरीही अजित पवार डगमगले नाहीत. त्यांनी त्यावर होणाऱ्या आरोपांना तितक्याच हिमतीने उत्तरे दिली.
अजित पवार हे आपल्या थेट बोलण्याबाबत प्रसिद्ध होते. काम होणार नसेल तर ते जागेवरच स्पष्ट सांगत. त्यामुळे त्यांनी अनेकांचा रोषही पत्करला होता. आपल्या बोलण्यामुळे ते अनेकदा अडचणीत आले. इंदापूर येथे पाण्याबाबत बोलताना त्यांची जीभ घसरली.
त्यावर त्यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर उपोषण करून आपली चूक कबूल केली. आपली चूक असेल तर ती मान्य करण्यात त्यांना कधीही लाज वाटत नव्हती; तसेच ते सारवासारव करण्याचा प्रयत्नही करत नसत. आपले चुकले हे ते जाहीरपणे सांगत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी पाहायचे होते. त्यांच्या वाढदिवसाला ‘भावी मुख्यमंत्री’ असे फलक राज्यभर लागायचे. मात्र अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे ते आता कधीही शक्य होणार नाही.















