सुखसागरनगरमधील रात्रीची घटना : तिघा चोरट्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दुकान बंद करून घरी जात असलेल्या ज्वेलर्सला दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी लोखंडी हत्याराने मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
भरतसिंह मानसिंग जोधा राठोड (वय ४३, रा. अजिंक्य अपार्टमेंट, सुखसागरनगर, कात्रज, मूळ रा. बिनमार, जि. जालोर, राजस्थान) असे गंभीर जखमी झालेल्या ज्वेलर्सचे नाव आहे. त्यांचे भाऊ सोमसिंह मानसिंग जोधा राठोड (वय ४३) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी तिघा चोरट्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सुखसागरनगरमधील महाराणी साडी दुकानाजवळ २७ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतसिंह राठोड यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांचे अपर इंदिरानगर येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. दुकान बंद करून ते घरी जात होते. सुखसागरनगरमधील महाराणी साडी दुकानाजवळ ते पोहोचले असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले.
त्यांनी हाताने मारहाण केली तसेच लोखंडी हत्याराने त्यांच्या डोक्यावर व दोन्ही हातांवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांनी आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणारे नागरिक त्यांच्याकडे येऊ लागल्याचे पाहून ते तिघे पळून गेले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे करीत आहेत.















