राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रस्तावावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आदेश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पाषाण येथील लमाण तांडा व परिसरात बेकायदा गावठी दारू तयार करून विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याला एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
थावरिया वाल्या पातलावत (वय ५३, रा. लमाण तांडा, पाषाण) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. पातलावत हा पाषाण परिसरात गावठी दारू तयार करून तिची वाहतूक व विक्री करत होता.
गावठी दारूच्या सेवनामुळे गंभीर स्वरूपाचे विकार तसेच जीवितहानीसारखे प्रकार घडण्याची शक्यता होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीही पातलावत याच्याविरुद्ध कारवाई केली होती. गावठी दारू विक्री प्रकरणी त्याच्याविरुद्ध यापूर्वी सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे १ लाख रुपयांचे बंधपत्र घेण्यात आले होते. तरीही त्याची गुन्हेगारी चढत्या क्रमाने वाढतच राहिली होती. तो गावठी दारू तयार करून तिची विक्री करत होता. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्यामार्फत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविण्यात आला.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रस्तावाची पडताळणी करून त्याला नाशिक कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार चतु:श्रृंगी पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करून त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक किरण पाटील यांनी विशेष कामगिरी बजावली. या कारवाईत निरीक्षक संदीप कदम, दुय्यम निरीक्षक प्रताप बोडेकर, शंकर जाधव तसेच जवान अक्षम म्हेत्रे, सचिन इंदलकर आणि राजू पोटे यांचा सहभाग होता.















