धनादेश चोरून बँकेतून काढले पैसे : लष्कर पोलिसांनी एकाला केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुलबाळ कोणी नसलेल्या व सध्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्ध मेजरच्या केअर टेकरने इतरांच्या मदतीने धनादेश चोरून तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण लक्षात येताच लष्कर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
याबाबत मेजर बोमन इरुशॉ अमारिया (वय ८७, रा. पुण्यधाम वृद्धाश्रम, कोंढवा) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सुप्रितसिंग भुपेंद्र कंडारिया (वय ३९, रा. माधव सोसायटी, कोथरुड) याला अटक केली आहे.
केअर टेकर राज शहा व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च २०२५ पासून आजपर्यंत बँक ऑफ इंडियाच्या कॅम्प शाखेत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेजर बोमन अमारिया यांना मुलबाळ अथवा वारसदार नाही. ते एकटेच असल्याने त्यांनी राज शहा याला केअर टेकर म्हणून नेमले होते.
काही काळापूर्वी ते वृद्धाश्रमात राहायला गेले. त्यांच्या बँक खात्यात पेन्शन जमा होत होती. ते वृद्धाश्रमात गेल्यानंतर केअर टेकर राज शहा याने सुप्रितसिंग कंडारिया व इतरांच्या मदतीने त्यांच्या बँक खात्याचे धनादेश चोरले. त्यावर बनावट सही करून वेळोवेळी १ कोटी ११ लाख ९३ हजार ९०० रुपयांची रक्कम काढली.
बँक खात्यातील रक्कम कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी केली. त्यानंतर त्यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी याबाबत माहिती घेऊन बँकेतून रक्कम काढणाऱ्या सुप्रितसिंग कंडारिया याला अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.















