घरासमोर गोंधळ का घालता असे विचारल्याने झाला होता वाद : कात्रजमधील संतोषनगर येथील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घरासमोर भांडण सुरू असल्याने “गोंधळ का घालता?” असे विचारल्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर परिसरात घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २९ जानेवारी) सायंकाळी साडेसहा वाजता शनि मंदिराजवळील दिग्विजय चौकात घडली.
या घटनेत अजमल अब्दुल नदाफ (वय २०, रा. अंजनीनगर, गणपती मंदिराजवळ, कात्रज) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अजमलचे वडील अब्दुल रहिम नदाफ (वय ४५, रा. बिलाल आशियाना, अंजनीनगर, कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीवरून पोलिसांनी काही युवकांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमल नदाफ हा ए.सी. दुरुस्तीचे काम करतो. त्याचे आणि आरोपींचे घर शेजारी-शेजारी आहे. सन २०२४ मध्ये आरोपी अजमलच्या घरासमोर गोंधळ घालत होते. त्यावेळी “आमच्या घरासमोर गोंधळ का घालता?” असे विचारल्याने त्यांच्यात वाद झाला होता.
या जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी अजमलला शनि मंदिराजवळील दिग्विजय चौकात अडवले आणि त्याच्या डोक्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केले. आंबेगाव पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलानी पुढील तपास करीत आहेत.















