पेट्रोल पंपाचा व्यवहार लवकर पूर्ण करण्यासाठी पुना क्लबमध्ये केला होता प्रतिबंध
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : स्वारगेट येथील पेट्रोल पंपाचा व्यवहार लवकर पूर्ण करावा, यासाठी महिलेला धमकी देऊन त्यांच्या जाण्यास प्रतिबंध केल्याप्रकरणी भाजपचे प्रवक्ते आणि पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मोशी नागरकट्टी मालविया (वय ४७, रा. मीरा सोसायटी, शंकरशेठ रोड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अली दारुवाला (वय ५०) व त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३० जानेवारी रोजी रात्री ९ वाजता पुना क्लब येथील स्विमिंग पूलच्या पार्किंगमध्ये घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी मालविया यांच्या आई-वडिलांच्या नावावर स्वारगेट येथे पेट्रोल पंप होता. पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी असल्याने त्यांची अली दारुवाला यांच्याशी ओळख होती. अली दारुवाला यांच्या सांगण्यावरून मोशी मालविया यांनी हर्षद गोल्वा यांना पेट्रोल पंप विकला होता. दरम्यान, कंपनीचे धोरण बदलल्याने काही कागदपत्रे आवश्यक असल्यामुळे हा व्यवहार पूर्ण झाला नव्हता.
मोशी मालविया या ३० जानेवारी रोजी पुना क्लबमध्ये गेल्या होत्या. रात्री क्लबमधून बाहेर पडताना त्या पार्किंगमध्ये आपली चारचाकी गाडी घेण्यासाठी गेल्या असता, तेथे अली दारुवाला व त्यांचे दोन साथीदार उभे होते. त्यांनी मालविया यांनी पार्क केलेल्या चारचाकी गाडीच्या मागे दुचाकी आडवी लावली होती आणि त्यामुळे त्यांना गाडी बाहेर काढण्यास प्रतिबंध झाला.
याबाबत विचारणा केल्यानंतर अली दारुवाला यांनी हर्षद गोल्वा यांच्यासोबतचा पेट्रोल पंपाचा व्यवहार लवकर पूर्ण करण्यासाठी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावर मालविया यांनी, “तुमचा याच्याशी काय संबंध?” असे विचारले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा मदने करीत आहेत.














