बार्शी शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : दि. ०५ डिसेंबर २०२४ रोजी गाडेगाव रोड, बार्शी येथे भरधाव ट्रॅव्हल्स वाहनाने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शांतीलाल उतरेश्वर बोराडे (रा. बार्शी) यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर संबंधित ट्रॅव्हल्सचा चालक कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाला होता.
या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १०४९/२४, कलम १०६ (१) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात यापूर्वीच ट्रॅव्हल्सच्या मालकास अटक करण्यात आली होती. मात्र, ट्रॅव्हल्स चालक रफिक अफजल शेख (रा. रहिम नगर, परभणी) हा गेल्या १४ महिन्यांपासून फरार होता. फरार आरोपीचा मुंबई, परभणी तसेच इतर ठिकाणी शोध घेण्यात आला होता. मात्र, तो सतत ठिकाण बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
दरम्यान, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बालाजी कुकडे यांनी आरोपीच्या शोधासाठी पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस अंमलदार संगप्पा मुळे व लखन घाडगे यांचे विशेष पथक नेमले. या पथकातील संगप्पा मुळे यांनी परभणी येथे गोपनीय बातमीदार नेमून शोधकार्य सुरू केले.
गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी परभणी येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच ती तात्काळ पोलीस निरीक्षकांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने परभणी येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले व सदर गुन्ह्यात अटक करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे.
ही यशस्वी कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, पोउपनि महेश गळगटे, पोलीस अंमलदार संगप्पा मुळे व लखन घाडगे यांनी केली.














