विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीत फसवणूक : बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बाणेर येथील जागा विकसित करण्यासाठी दिली असताना करारानुसार मिळकतीमध्ये फ्लॅट न देता फसवणूक करून मानसिक त्रास दिल्याने, ज्या जागेवर इमारत उभी राहिली त्याच इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाने उडी मारून आत्महत्या केली.
नरेश उमाकांत महाजन (वय ६९, रा. अंबरनाथ ईस्ट, जि. ठाणे) असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. ही घटना बालेवाडी–बाणेर येथील मोझे कॉलेज परिसरातील सर्व्हे नंबर २४/१/१अ येथे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत महाजन यांचा मुलगा मयूर नरेश महाजन (वय ४१, रा. अंबरनाथ ईस्ट, जि. ठाणे) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी स्विटी असोसिएट्सचे जयंतीलाल ताराचंद ओसवाल (वय ५६) आणि रिषभ ओसवाल (वय ३०, दोघे रा. भवानी पेठ) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश महाजन हे महावितरणमध्ये अधिकारी होते. त्यावेळी त्यांनी बाणेरमध्ये जागा घेतली होती. सेवानिवृत्तीनंतर ते मुलासह अंबरनाथ ईस्ट येथे राहत होते. त्यांनी बाणेर येथील जागा स्विटी असोसिएट्सचे जयंतीलाल ओसवाल यांना विकसित करण्यासाठी दिली होती.
फिर्यादी यांच्या जागेवर मान्य केलेल्या करारानुसार अटी व शर्तींनुसार ओसवाल यांनी मिळकतीमध्ये फ्लॅट देण्याचे सांगितले होते. मात्र, कराराचे पालन न करता फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली व त्यांना मानसिक त्रास दिला. नरेश महाजन यांच्या जागेवर ७ मजली इमारत उभी राहिली आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून आतील कामे सुरू आहेत.
नरेश महाजन हे १६ फेब्रुवारी रोजी येथे आले होते. त्यांनी कराराप्रमाणे फ्लॅट देण्याबाबत ओसवाल यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यांनी नरेश महाजन यांना मानसिक त्रास देत धमकावले. या त्रासाला कंटाळून ते इमारतीच्या ७ व्या मजल्यावर गेले आणि तेथून उडी मारून आत्महत्या केली. बाणेर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.



















