कर्जत येथे राज्यस्तरीय पत्रकार संघ पुरस्कार सोहळा संपन्न…
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करत पत्रकारांनी आपली शोध पत्रकारिता अखंडपणे सुरू ठेवली पाहिजे. मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा होत असतो. त्यासाठी एस. एम. देशमुख यांचे प्रयत्न अफाट असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत हेमंत देसाई यांनी व्यक्त केले.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील रॉयल कार्यालयात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडून देण्यात येणारा रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी हेमंत देसाई यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. एम. देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद आष्टिवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, पत्रकार मंदार फणसे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना देशमुख म्हणाले की, पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी परिषद राज्यभर कार्यरत असून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. दर दोन वर्षांनी होणारे राष्ट्रीय अधिवेशन यंदा उदगीर येथे होत असून ते अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र यावे. सर्वांचे आभार मानत कर्जत प्रेस क्लबने केलेल्या नियोजनाचे विशेष कौतुक त्यांनी केले.
पत्रकारांना विविध सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्रामध्ये प्रयत्न करणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. पत्रकार प्रसंगी जीव धोक्यात घालून अत्यंत कष्टाने पत्रकारिता करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आमदार महेंद्र थोरवे यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची भूमिका अधोरेखित करत पत्रकारांनी निर्भयपणे विषय मांडावेत, असे आवाहन केले. कर्जत तालुक्यात पत्रकारांसाठी अद्ययावत पत्रकार भवन उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दिला जाणारा पत्रमहर्षी रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा परभणी जिल्हा पत्रकार संघाला देण्यात आला. तसेच दहा तालुका संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन कर्जत प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यातून जवळपास सातशे पत्रकार एका छताखाली उपस्थित होते. या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार, कार्याध्यक्ष विलास श्रीखंडे, सल्लागार विजय मांडे, अजय गायकवाड, राहुल देशमुख, अनिल जावळे, विद्यानंद ओव्हाळ, मल्हार पवार, अतुल माळी यांच्यासह अनेक पत्रकारांनी परिश्रम घेतले.















