एच. व्ही. देसाई महाविद्यालयात “विकसित भारत २०४७” विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण सहाय्यता केंद्र ‘करिअर कट्टा’ व एच. व्ही. देसाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “विकसित भारत २०४७ : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका” या महत्त्वपूर्ण विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
एच. व्ही. देसाई महाविद्यालयात आयोजित या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी व यशदा संस्थेचे उपमहासंचालक राजीव नंदकर तर प्रमुख वक्ते म्हणून बी. एम. सी. सी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत साठे उपस्थित होते. या कार्यशाळेचे उद्घाटन दि. पुना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन व ज्येष्ठ उद्योजक डॉ. राजेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राजेश शहा यांनी करिअर कट्टा उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व विकासासाठी करिअर कट्ट्याचे विविध उपक्रम अत्यंत उपयुक्त असून, आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांसोबतच यशस्वी उद्योजक घडविण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल एच. व्ही. देसाई महाविद्यालयास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार दि. पुना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन व ज्येष्ठ उद्योजक डॉ. राजेश शहा यांनी स्वीकारला.
या वेळी एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव तसेच मॉडर्न गणेश खिंड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांना पुणे शहरातील उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे ग्रामीण विभागातून शारदाबाई महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महामुनी, टी. सी. कॉलेज बारामतीचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप तसेच हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, राजगुरुनगरचे प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे यांनाही उत्कृष्ट प्राचार्य म्हणून गौरविण्यात आले.
याच कार्यक्रमांतर्गत पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांना विविध उपक्रमांतील प्राविण्याबद्दल विभागीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दि. पुना गुजराती केळवणी मंडळाने आपल्या स्थापनेची १०० वर्षे पूर्ण केल्याबद्दल करिअर कट्टा संस्थापक अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते डॉ. राजेश शहा यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व मॉडर्न महाविद्यालय, गणेश खिंडचे प्राचार्य डॉ. संजय खरात उपस्थित होते. पुणे, अहिल्यानगर व नाशिक विभागातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या औचित्याने प्रमुख वक्ते डॉ. प्रशांत साठे यांनी “विकसित भारत : २०४७ आर्थिक विकासात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची भूमिका” या विषयावर माहितीपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यान दिले. या कार्यक्रमाचे आयोजन करिअर कट्टा संस्थापक अध्यक्ष यशवंत शितोळे व एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर कट्टा पुणे विभागीय समन्वयक डॉ. प्रभाकर घोडके, प्रा. विजया पीसे व प्रा. ऐश्वर्या बुरुड यांनी केले.

















