कोथरुड पोलिसांनी मुलीच्या १० नातेवाईकांवर गुन्हा दाखल करुन ७ जणांना केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करत मुलीने तरुणाला घरी बोलावले असताना तिच्या नातेवाईकांनी त्याला टेरेसवर नेऊन नग्न करून लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
खून झालेल्या तरुणाचे नाव नागेश संजय जाधव (वय २३, रा. जुनी वडारवाडी, मंजाळकर चौक, शिवाजीनगर) असे आहे. याबाबत त्यांची आई सुरेखा संजय जाधव (वय ४५, रा. जुनी वडारवाडी) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात वृषाली अनिल शिंदे (३४), सुनिता सुनील शिंदे (४०), जयश्री लक्ष्मण शिंदे (३१), तुळशी योगेश शिंदे (२४), गंगा संजय पवार (४५), सुनील शिंदे आणि अनिल शामराव शिंदे (३९) (सर्व रा. मेगासिटी, एसएनडीटीजवळ, कोथरुड) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच माणिक संजय पवार, पोपट शिंदे आणि योगेश शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शनिवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मेगासिटी येथील एका इमारतीच्या टेरेसवर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश जाधव हा शिवाजीनगर येथील एका कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. त्याची मेगासिटी येथे राहणाऱ्या एका तरुणीशी मैत्री होती. दोघे मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात होते.
१४ मार्च रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास नागेशला फोन आला. त्यानंतर तो मोटारसायकलवरून घरातून बाहेर पडला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्याच्या मोबाईलवरून त्याची आई सुरेखा जाधव यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने, “तुमचा मुलगा नागेश मेगासिटी येथे आहे. आम्ही त्याला मारहाण केली आहे. तुम्ही १० मिनिटांत येथे येऊन मुलाला घेऊन जा, अन्यथा आम्ही त्याला खाली टाकून देऊ,” असे सांगून फोन बंद केला.
यानंतर सुरेखा जाधव तातडीने मेगासिटी येथे गेल्या. तेथे मोठी गर्दी जमली होती. त्या टेरेसवर गेल्यावर त्यांना त्यांचा मुलगा नागेश खाली पडलेला दिसला. त्याच्या अंगावर कपडे नव्हते आणि काही महिला त्याला मारहाण करत होत्या.
स्थानिकांच्या मदतीने त्यांनी नागेशला रिक्षाने रत्ना हॉस्पिटलमध्ये नेले. रुग्णालयात नेत असताना नागेशने आपल्या आईला सांगितले की, त्याची एका मुलीसोबत मैत्री होती आणि ती त्याला फोन करून घरी बोलावून घेतले होते. तेथे गेल्यावर तिची आई, चुलते आणि इतर नातेवाईकांनी मिळून त्याला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
रत्ना हॉस्पिटलमधून त्याला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना नागेशचा मृत्यू झाला. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल माने करत आहेत.















