करमाळ्यातील चौघांना पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने ७२ किलो गांजा जप्त केला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : टुरिस्ट टॅक्सीद्वारे गांजाची वाहतूक करणाऱ्या तस्करांना पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने कारमधील तसेच घरातील असा १९ लाख ९३ हजार रुपयांचा ७२ किलो गांजा आणि कार जप्त केली आहे.
भिवा कालिदास वाघमोडे (वय ३६), विष्णू भागवत वाघमोडे (वय २८, दोघे रा. धायखिंडी, वाघमोडे वस्ती, ता. करमाळा, जि. सोलापूर), हरि श्रीपती ढवळे (वय ३२, रा. श्रीदेवीचा माळ, ता. करमाळा, जि. सोलापूर), मनोज अनिल सुरवसे (वय २९, रा. भवानी पेठ, धायखिंडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांचे सहकारी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे यांना गुप्त माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून विक्रीसाठी गांजा नेला जाणार आहे. त्यानुसार बोल्हाई माता मंदिराजवळ, केसनंद-वाडे बोल्हाई रोडलगत टेकडीच्या बाजूला मोकळ्या जागेत सापळा रचण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार कारचा शोध घेऊन ती ताब्यात घेण्यात आली. त्यातील चौघांना पकडून कारच्या डिक्कीची तपासणी केली असता चार पोत्यांमध्ये २९ प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळलेला ५८ किलो ५८० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी चौघांना अटक करून त्यांच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
भिवा वाघमोडे याच्या घराची झडती घेतली असता तेथे आणखी १४ किलो गांजा आढळून आला. आरोपींकडून एकूण १९ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा ७२ किलो गांजा व कार जप्त करण्यात आली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, ऋषिकेश ताकवणे, प्रशांत कापुरे, निले साळवे, निर्णय लांडे, विनायक साळवे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, नेहा तापकीर, सोनाली नरवडे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांनी केली आहे.
अंमली पदार्थ तस्करीसाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर – अंमली पदार्थ, विशेषतः गांजाची तस्करी पुणे शहरात ओडिशापासून केली जात असल्याचे दिसून येते. यासाठी तस्कर विविध मार्गांचा वापर करत आहेत. पूर्वी खासगी गाड्यांमधून तस्करी केली जात होती. त्यानंतर एसटी बसमधून, विशेषतः धुळे व शिरपूर येथून तस्करी सुरू झाली. पोलिसांनी त्यावर कारवाई केल्यानंतर आलिशान गाड्यांचा वापर करण्यात आला. आता संशय कमी यावा म्हणून टुरिस्ट टॅक्सीचा वापर सुरू झाला असून, तोही पोलिसांच्या कारवाईत उघड झाला आहे.


















