पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने पेट्रोल टाकून दुचाकी जाळली
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लग्नानंतर काही महिन्यांत झालेल्या वादातून माहेरी निघून गेलेल्या पत्नीने नांदण्यास येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
राजकुमार इरन्ना सुतार (वय २७, रा. समर्थनगर, सिंहगड रोड) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत श्र्वेता विजय काटकर (श्र्वेता राजकुमार सुतार) (वय २७, रा. सदगुरु गॅलेक्सी अपार्टमेंट, दांगट इंडस्ट्रियल कमान, शिवणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शिवणेतील सदगुरु गॅलेक्सी अपार्टमेंट येथे २२ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजून १७ मिनिटांनी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्र्वेता काटकर आणि राजकुमार सुतार यांचा विवाह झाला आहे. लग्नानंतर श्र्वेता या तीन महिने सासरी राहिल्या. त्यानंतर त्यांच्यात वाद झाल्याने त्या माहेरी निघून आल्या. गेल्या दीड वर्षांपासून ते विभक्त राहत आहेत.
राजकुमार सुतार हा तिला सासरी नांदायला ये, असे सांगण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. त्यावेळी त्यांनी नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने पेट्रोल टाकून श्र्वेता यांच्या ज्युपिटर मोपेडला काडी लावून पेटवून दिले. या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पोलिसांनी राजकुमार सुतार याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे तपास करत आहेत.


















