शहिद दिनानिमित्त आयोजित शिबिरात युवक व महिलांचा मोठा सहभाग
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पारगाव : पारगाव येथे सलग १९ वर्षांपासून सुरू असलेल्या रक्तदान उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ४० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
राष्ट्रसंत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त तसेच भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांच्या शहिद दिनानिमित्त वाशी तालुक्यातील पारगाव येथे आयोजित रक्तदान शिबिराला यावर्षीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गेल्या सलग १९ वर्षांपासून सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाने यंदाही मानवतेचा संदेश देत आपली यशस्वी परंपरा कायम ठेवली. या रक्तदान यज्ञात यंदा एकूण ४० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.
या कार्यक्रमाचे आयोजन पारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे,” या भावनेतून युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, या शिबिरात महिलांचाही लक्षणीय सहभाग दिसून आला. अनेक तरुणांनी प्रथमच रक्तदान करून समाजासाठी योगदान दिले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी बीड येथील सिटी ब्लड बँकेच्या वैद्यकीय पथकाने विशेष सहकार्य केले. रक्तदात्यांची तपासणी, सुरक्षित रक्तसंकलन आणि आवश्यक सुविधा यांची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी आयोजकांनी “रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा रक्तदान करावे,” असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. चंद्रशेखर कोकणे, डॉ. प्रशांत मोटे, बाबासाहेब रोटे, सोनाली रोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. रोटे दाम्पत्याने रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ केला.
कार्यक्रमास कॉ. पंकज चव्हाण, प्रदीप मोटे, किशोर उंदरे देशमुख, बालाजी गिराम, सलीम शेख, अमोल गायकवाड, उमेश आखाडे, महादेव मोटे, प्रकाश मोटे, माऊली ताटे, पत्रकार राहुल डोके, सुरेश लाखे, सारंग मोटे, संपत काटवटे, सुशांत कोकणे, संतोष चौधरी, अशोक भोरे, किशोर इंगळे, विनायक आखाडे, विशाल खवले, सुनील गायकवाड, बबन फुलवरे, राजू पठाण, विशाल गायकवाड, लहू पवार, नितीन माने, बिभीषण कोकाटे, ऋतुपर्ण गालफडे तसेच जयश्री माने, सुनीता घुले, अलका काटवटे, हावळे मॅडम आणि गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे पारगाव परिसरात सामाजिक जाणीव वाढीस लागून युवकांमध्ये सेवाभाव रुजत असल्याचे दिसून आले.



















