बाणेरमधील घटनेत दोघा बांधकाम ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचवेळी पुणे शहरातील काही भागात १८ मार्च रोजी अवकाळी पाऊस पडला होता. या पावसामुळे सुतारकाम करणाऱ्या एका कारागीराला विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने बाणेर पोलिसांनी दोघा ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उज्ज्वल मजुमदार (वय ३२, रा. लोटस रिअॅलिटी, उमराणी हॉस्पिटलजवळ, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या कारागीराचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी सरस्वती मजुमदार (वय २८) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी बांधकाम करणाऱ्या व्हॅलकन इन्फ्रा कंपनीचे प्रविण चंद्रकांत जवळकर (रा. ब्लक बिल्डिंग, अॅलोरिंग स्काय, विधाते वस्ती, औंध-बाणेर रोड) आणि महेंद्र केशव चांडगे (रा. सहकारनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वल मजुमदार सुतारकाम करीत होते. बालेवाडीतील लोटस रिअॅलिटी या गृहप्रकल्पात स्लॅब टाकण्यापूर्वी कॉलम उभारण्यासाठी लागणारे प्लायवूड कापण्याचे काम ते करत होते.
ते गृहप्रकल्पाच्या आवारात पत्नीसह राहत होते. १८ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास ते सुतारकाम करत असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्यांनी प्लायवूड कापण्याचे मशीन बंद करून कटरची वायर गोळा करत असताना त्या वायरच्या जोडलेल्या ठिकाणी त्यांना विजेचा धक्का बसला आणि ते जखमी झाले.
त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. व्हॅलकन इन्फ्रा कंपनीने कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना न करता निष्काळजीपणा केल्यामुळे उज्ज्वल मजुमदार यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी जबाबदार ठरवत पोलिसांनी ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण करीत आहेत.




















