कर्करोग प्रतिबंधासाठी जागरूकतेवर भर : ३०० हून अधिक रुग्णांचा सहभाग
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सूर्यदत्त संस्थेत आयोजित आरोग्य शिबिरात कर्करोगासह विविध आजारांच्या तपासण्या करण्यात येत नागरिकांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स आणि राहुरी येथील डॉ. माने मेडिकल फाउंडेशन व साईधाम हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराला नागरिकांचा, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचा लाभ ३०० हून अधिक रुग्णांनी घेतला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच डॉ. स्वप्नील माने यांच्या नेतृत्वाखाली कर्करोग, स्त्रीरोग, फिजिओथेरपी आदी विविध तपासण्या करण्यात आल्या. यासाठी ‘साईधाम मॉडेल ऑफ कॅन्सर’ या फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
या उपक्रमांतर्गत तोंडाचा कॅन्सर, स्तन कॅन्सर, गर्भाशयाचे विकार तसेच स्नायू व अस्थिसंस्थेशी संबंधित तपासण्या करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. स्वप्नील माने यांनी कर्करोग प्रतिबंधासाठी व्यसनमुक्त जीवनशैली, संतुलित आहार आणि वेळेवर तपासणी यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, प्राचार्य डॉ. सिमी रेठरेकर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र, योग्य वेळी आरोग्य तपासण्या, प्रतिबंधात्मक उपाय आणि सातत्यपूर्ण जनजागृती यामुळे अनेक आजारांपासून दूर राहता येऊ शकते. आरोग्य तपासणी शिबिरे ही निदानाबरोबरच नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. सूर्यदत्त संस्थेत हेल्थकेअर, फार्मसी, फिजिओथेरपी अशा विविध शाखा असल्याने ‘एज्यु-सोशिओ हेल्थ इनिशिएटिव्ह’ अंतर्गत सातत्याने अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन




















