वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणाऱ्या ६ जणांना येवलेवाडी पोलिसांनी केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाला दांडक्याने मारहाण करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवली. येवलेवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून या टोळक्यातील ६ जणांना अटक केली आहे.
अविनाश मारुती दीक्षित (वय २०, रा. मरळ बिल्डिंग, भोलेनाथ चौक, कोंढवा बुद्रुक) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी चिक्या उर्फ विश्वजित भोसले (वय २१, रा. साईनगर, कोंढवा), साई उर्फ वक्या हौसमणी, आर्यन वाव्हळे, मंगेश उर्फ डुल्या सावंत, सोहम हुरळीकर, दर्शन वठार (सर्व रा. कोंढवा) यांना अटक करण्यात आली.
त्यांच्या सोबत तीन ते चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते पसार झाले आहेत. याबाबत अविनाश दीक्षित यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोंढव्यातील भोलेनाथ चौक येथे २३ मार्च रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षित आणि आरोपी यांच्यात दोन महिन्यांपूर्वी एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला होता. मंगळवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास दीक्षित आणि त्याचा मित्र रिक्षात मोबाइलवर गेम खेळत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले.
त्यांच्या हातात दांडके व शस्त्रे होती. टोळक्याने दीक्षित याला शिवीगाळ करून दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच दीक्षित आणि त्याच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली तसेच शस्त्रे उगारून नागरिकांना शिवीगाळ केली.
या घटनेत अविनाश दीक्षित गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खराडे करीत आहेत.




















