पोलीस आयुक्त अमितेश कुमार : सर्वाधिक नियमभंगाच्या केसेस करणाऱ्यांचा गौरव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नागरिकांनी ‘पीटीपी’ अॅपचा वापर करून शहरातील अनाधिकृत होर्डिंग्सबाबत माहिती पोलिसांना द्यावी. बेकायदा होर्डिंग्सवर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्याचप्रमाणे रस्त्यावरील बेवारस, बिनधनी वाहने तसेच रस्त्यावर विनाकारण पार्क करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने हटवून रस्ते नागरिकांसाठी मोकळे करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी अशा वाहनांची माहिती ‘पीटीपी’ अॅपद्वारे कळवावी, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
‘पीटीपी’ अॅपद्वारे सर्वाधिक वाहतूक कारवाई नोंदविणाऱ्या विजेत्यांचा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते. वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ‘पीटीपी’ अॅपचा वापर सुरू केला आहे.
एका महिन्यात ६२ हजार ३१८ नागरिकांनी हे अॅप डाउनलोड केले असून तब्बल ५ कोटी ३९ लाख ४४ हजार २५० रुपयांचा वाहतूक नियमभंगाचा दंड भरला आहे. या अॅपद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत पीपीसीआर व पुणे शहर वाहतूक शाखा यांच्या विद्यमाने सर्वाधिक कारवाई करणाऱ्यांना प्रथम पारितोषिक ५० हजार रुपये व प्रमाणपत्र, तर द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पंचम पारितोषिक अनुक्रमे २५ हजार, १५ हजार, १० हजार व ५ हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात आली. तसेच ‘पीटीपी’ अॅपद्वारे प्राप्त तक्रारींवर प्रभावी कारवाई करणाऱ्या तीन पोलीस अंमलदारांनाही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
‘पीटीपी’ अॅपचा वापर करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीवर कोणताही वाहतूक नियमभंगाचा दंड प्रलंबित नसावा, अशी अट आहे. त्यामुळे अॅप वापरकर्त्यांनी अॅप वापरण्यापूर्वी स्वतःवर असलेला एकूण ९ कोटी ३२ लाख ८२ हजार ५० रुपयांचा दंड भरला आहे.
जानेवारी महिन्याअखेर ९३ हजार १९० नागरिकांनी हे अॅप डाउनलोड केले होते. त्यापूर्वी त्यांनी स्वतःवर असलेला ३ कोटी ९३ लाख ३७ हजार ९०० रुपयांचा दंड भरला होता. या कार्यक्रमास सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते.
दीड लाख नागरिकांनी केले ‘पीटीपी’ अॅप डाउनलोड
आतापर्यंत १ लाख ५५ हजार नागरिकांनी ‘पीटीपी’ अॅपचा वापर केला आहे. या अॅप वापरकर्त्यांनी ९ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड भरला आहे. तसेच वाहतूक नियमभंगाचे २ लाख ४९ हजार ८०० फोटो पाठविण्यात आले असून त्याची पडताळणी करून वाहतूक पोलिसांनी १ लाख ७६ हजार ८८७ प्रकरणांत चलन केले आहे.




















