शिवाजी रोडवरील घटना : जुनी बोअरवेल जिवंत करताना गेले ६० फूट खोल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शुक्रवार पेठेतील शिवाजी रोडवरील भूमिगत मेट्रोच्या वर घरमालकाने वाडा पाडून तेथील जुनी बोअरवेल जिवंत करताना ६० फूटांपेक्षा अधिक खोल खोदकाम केल्याने मेट्रोच्या बोगद्याला ६ इंचाचा खड्डा पडला. बोगद्याच्या सिमेंटच्या रिंगमधून पाणी गळू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापक शंतनु गोरात्रा यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मूळ घरमालक धनंजय मोटे आणि ठेकेदार जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना शुक्रवार पेठेतील खडक पोलीस ठाण्यासमोर १४ मार्च रोजी दुपारी पावणे एक वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरमालक धनंजय मोटे यांच्या घराखालून भूमिगत मेट्रोचा बोगदा जातो. बोगद्याचे काम करताना त्या परिसरातील नागरिकांना मेट्रोच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे खोदकाम किंवा बोअरवेल घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
१४ मार्च रोजी दुपारी ट्रेन ऑपरेटर भूषण प्रदीप बारिंगे यांनी मेट्रोच्या ऑपरेशन कंट्रोल रूममध्ये कळविले की, स्वारगेट ते मंडई मेट्रो स्टेशनदरम्यान डाऊन लाईनवरील भूमिगत बोगद्याच्या वरच्या बाजूने पाण्याची गळती होऊन पाणी ट्रॅकवर येत आहे.
माहिती मिळताच महाव्यवस्थापक शंतनु गोरात्रा, स्टेशन मॅनेजर अमेय केसरकर, सुरक्षा निरीक्षक विलास गुजर यांनी बोगद्यात पाहणी केली. पाणी नेमके कुठून येत आहे, हे लक्षात न आल्याने त्यांनी बोगद्याच्या वर रस्त्यावरून पाहणी केली.
खडक पोलीस ठाण्यासमोर शिवाजी रोडवर हिरव्या जाळीने संरक्षित भागात वाडा पाडून त्या जागेत बोअरवेल खोदल्याचे आढळले. चौकशीअंती ठेकेदार जगताप यांनी घरमालकाच्या सांगण्यावरून बोअरवेल घेतल्याचे सांगितले. घरमालक धनंजय मोटे यांच्या परवानगीने जुनी बोअरवेल पुन्हा सुरू करण्यात आली होती.
ही बोअरवेल ६० फूट खोल घेतल्यामुळे मेट्रोच्या बोगद्याच्या सिमेंट रिंगला तडा जाऊन सुमारे ६ इंच व्यासाचे छिद्र पडले आणि पाण्याची गळती सुरू झाली, असे स्पष्ट झाले. या घटनेत अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर १७ मार्च रोजी पाण्याची गळती थांबवण्यात आली. त्यानंतर मेट्रोकडून फिर्याद देण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्हटकर करीत आहेत.
भविष्यात मोठा धोका
शिवाजीनगर ते स्वारगेट ही मेट्रो भूमिगत असून दोन समांतर बोगदे साधारण ६० ते १०० फूट खोलीवर आहेत. बोअरवेल घेताना ठेकेदाराने ६० फूटांपेक्षा अधिक खोल खोदकाम केल्याने बोगद्याला छिद्र पडले. या छिद्रातून पाणी मेट्रो मार्गावर येत असल्याने प्रकार उघड झाला. सध्या गळती थांबवण्यात आली असली तरी भविष्यात पाणी ट्रॅकवर आल्यास मेट्रो सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून मोठ्या धोक्याची शक्यता नाकारता येत नाही.



















