ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील यांचे जीवनमूल्यांवर प्रभावी मार्गदर्शन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पारगाव : पारगाव येथे शहीद दिनानिमित्त आयोजित कीर्तनातून त्याग, कष्ट आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त पारगाव येथे भक्तिमय वातावरणात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे पाटील (मुळशी) यांनी प्रभावी कीर्तनातून नागरिकांना जीवनमूल्यांचा संदेश दिला.
कीर्तनादरम्यान संत तुकाराम महाराजांच्या “एका बीजा केला नास । मग भोगिले कणीस ।।” या अभंगावर सखोल विवेचन करत त्यांनी त्याग आणि कष्टाचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकरी एक बीज पेरून त्याग करतो, तेव्हाच त्याला अनेक दाण्यांचे कणीस मिळते; त्याचप्रमाणे जीवनात यश मिळवण्यासाठी त्याग आणि परिश्रम आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“लाभ नाही फुकासाठीं । केल्याविण जीवासाठीं ।।” या अभंगातील ओळींचा संदर्भ देत त्यांनी कोणत्याही क्षेत्रात कष्टाशिवाय यश मिळत नसल्याचे सांगितले. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यासच जीवनात यश आणि समाधान मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी शहीदांचे स्मरण करून सांगितले की, देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांच्या बलिदानामुळेच आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करणे हीच खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी आवाहन केले.
सध्या समाजात बुवा-बाबांचा सुळसुळाट वाढत असून, महिला भगिनींनी चिकित्सक दृष्टिकोन ठेवून अध्यात्म करावे, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये आणि अंधश्रद्धा बाळगू नये, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या कीर्तन कार्यक्रमाला पारगाव येथील गजानन भजनी मंडळ तसेच जनकापूर येथील भजनी मंडळ यांनी साथ-संगत केली. कार्यक्रमामुळे परिसरात भक्ती आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.



















