दीड कोटींची मागितली होती खंडणी : गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : टिंबर मार्केट येथील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यांच्या सुटकेसाठी दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या ५ गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.
सौरभ विश्वनाथ पवार (वय २७, रा. बावधन), शिरीष खोपडे (वय २६, रा. आंबेगाव), मंदार श्रीधर दारवटकर (वय ३०, रा. वडगाव), साहिल श्रीकांत खुटवड (रा. भिलारेवाडी) आणि प्रणव बबन निवगुणे (वय २३, रा. आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत प्रांजल जयेश ओसवाल (वय २९, रा. गणेश पॅलेस, क्रिसेंट हायस्कूलसमोर, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २४ मार्च रोजी पहाटे १ वाजता घडली. व्यवसायातील व्यवहारावरून ही घटना घडल्याचे सांगितले जाते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश ओसवाल यांचे टिंबर मार्केटमध्ये दुकान आहे. ते २३ मार्च रोजी नेहमीप्रमाणे दुकानात गेले होते; मात्र रात्री ते घरी परतले नाहीत. मध्यरात्री १ वाजता त्यांच्या पत्नीला व्हॉट्सअॅप कॉल आला.
अज्ञात व्यक्तींनी जबरदस्तीने मला सोबत नेले असून मला डांबून ठेवले आहे. माझ्या जीवाला धोका आहे. १ कोटी ५० लाख रुपये तयार ठेव, मी तुला दोन तासांनी परत फोन करतो, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर फोन बंद झाला. या घटनेने घाबरलेल्या प्रांजल ओसवाल यांनी पोलिसांना याची माहिती दिली. स्वारगेट पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथक आरोपींचा शोध घेऊ लागले. तांत्रिक विश्लेषणातून आरोपी जयेश ओसवाल यांना घेऊन नसरापूर येथे गेल्याचे समजले.
त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवून अपहरण करणाऱ्या ५ जणांना पकडले आणि जयेश ओसवाल यांची सुटका केली. व्यवसायातील व्यवहारावरून हे अपहरण करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम पुढील तपास करीत आहेत.



















