पीडीसीसी बँकेत लिपिकाची नोकरी देण्याचा केला होता बहाणा : बंडगार्डन पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पीडीसीसी बँकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची ओळख असल्याचे सांगून बँकेत लिपिक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २ लाख रुपये घेऊन बनावट अपॉईंटमेंट लेटर देऊन फसवणूक करणाऱ्यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
ऋषिकेश गणेश वाघमारे (वय २७, रा. सपकाळवाडी, इंदापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कासारवाडी येथील एका ३८ वर्षीय नागरिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची पत्नी एम.कॉम. झाली असून तिची नोकरी लावून देण्याचे काम ऋषिकेश वाघमारे करून देईल, असे ओळखीच्या व्यक्तीने सांगितले.
त्यानुसार ते नोव्हेंबर २०२५ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेले होते. तेथे त्यांची ऋषिकेश वाघमारे याच्याशी भेट झाली. त्याने बँकेचे व्हाईस चेअरमन सुनिल चांदेरे व चेअरमन दिगंबर दुगार्डे यांच्याशी चांगली ओळख असल्याचे सांगितले. यापूर्वी अनेक मुलांना पीडीसीसी बँकेत क्लर्क पदावर नोकरीला लावले असल्याचेही त्याने सांगितले.
फिर्यादींच्या पत्नीला क्लर्क पदावर नोकरीला लावून देतो, असे सांगून त्यासाठी ७ लाख रुपये लागतील, असे त्याने सांगितले. त्यापैकी २ लाख रुपये अपॉईंटमेंट लेटर देण्यापूर्वी व उर्वरित ५ लाख रुपये जॉइनिंग झाल्यानंतर द्यावे लागतील, असे सांगितले. फिर्यादींनी तयारी दर्शवल्यानंतर ऋषिकेश वाघमारे याने सुनिल चांदेरे यांना त्यांच्या मोबाईलवरून फोन करून बोलणे करून दिले. त्यामुळे फिर्यादींचा त्याच्यावर विश्वास बसला.
यानंतर ऋषिकेश वाघमारे याने व्हाईस चेअरमन सुनिल चांदेरे यांच्या अॅसिस्टंट पूजा मंगेश ढगारे यांच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादींनी २ लाख रुपये पाठविले. त्यानंतर वारंवार पाठपुरावा केल्यानंतर वाघमारे याने २४ नोव्हेंबर २०२५ रोजी पीडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यालयात बोलावून घेतले.
तेथे बँकेच्या लेटरहेडवर फिर्यादींच्या पत्नीचे नाव नमूद करून ८ जानेवारी ते १० मार्च २०२६ या कालावधीसाठी लिपिक पदावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देत असल्याबाबत कार्यकारी मुख्याधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्या सहीचे अपॉईंटमेंट लेटर दिले.
फिर्यादी ते लेटर घेऊन घरी आल्यावर त्या लेटरवर बँकेचा शिक्का नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला बँकेकडून ई-मेलद्वारे अपॉईंटमेंट लेटर पाठविण्यास सांगितले; मात्र त्याने लेटर न पाठवल्याने वाघमारे याने बनावट अपॉईंटमेंट लेटर देऊन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
बंडगार्डन पोलिसांनी ऋषिकेश वाघमारे याला अटक केली आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण अधिक तपास करत आहेत.
अॅसिस्टंट म्हणून पत्नीचेच बँक खाते दिले
ऋषिकेश वाघमारे याला अटक केल्यानंतर चौकशीत त्याने व्हाईस चेअरमन सुनिल चांदेरे यांच्या अॅसिस्टंट म्हणून पूजा मंगेश ढगारे यांचे बँक खाते दिले होते. प्रत्यक्षात बँकेत पूजा नावाची कोणतीही व्यक्ती काम करत नाही. ते बँक खाते त्याच्या पत्नीचेच असून त्याच खात्यावर त्याने २ लाख रुपये घेतले होते.



















