रामनवमी मिरवणुकीत बॅनर लावण्यावरुन झाली होती भांडणे : बी टी कवडे रोडवरील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रामनवमी मिरवणुकीत बॅनर लावण्याच्या वादातून बी. टी. कवडे रोड परिसरात एका रिक्षाचालक तरुणावर टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. मुंढवा पोलिसांनी या प्रकरणात दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
अक्षय आनंद गवळी (वय ३०, रा. कात्रज) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी त्याचा भाऊ अजिंक्य आनंद गवळी (वय २७, रा. शक्तीनगर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार काशीराम मोघे (वय ३०), अभिषेक मोघे (वय २७), नंदू नवनाथ थोरात (वय २९, सर्व रा. बी. टी. कवडे रोड, घोरपडी) तसेच त्यांच्या इतर तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजता हडपसर रेल्वे स्टेशन रोडवरील जाधव वस्ती परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजिंक्य गवळी व जखमी अक्षय गवळी हे दोघेही रिक्षाचालक आहेत. रामनवमी निमित्त अक्षय गवळी कात्रजहून घोरपडी येथे भावाकडे आला होता. ते दोघे अखंड हिंदू संघाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत कोणतेही फोटो किंवा बॅनर न लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
तरीही काशीराम मोघे याचा बॅनर लावण्यात आल्याने अजिंक्य गवळी व इतरांनी त्याला विरोध केला. यावरून सायंकाळी साडेआठच्या सुमारास नंदू थोरात याने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व अजिंक्य गवळी यांच्या गालावर चापट मारली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये झटापट झाली. उपस्थित नागरिकांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला.
मिरवणूक संपल्यानंतर अजिंक्य गवळी व त्याचा मित्र अमित परदेशी याला सोडण्यासाठी अक्षय गवळी, विनायक म्हेत्रे व इतर जण मोटारसायकलवरून जात होते. ताडीगुत्ता चौकात सिग्नलवर असताना आरोपींनी त्यांना पाहिले व पुन्हा शिवीगाळ केली.
त्यानंतर रात्री ११ वाजता जाधव वस्ती येथे आरोपींनी त्यांना अडवून “तुम्हाला खूप माज आला आहे” असे म्हणत काशीराम मोघे व अभिषेक मोघे यांनी अक्षय गवळी याच्यावर धारदार शस्त्राने डोके, पोट, हात व पायावर वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला.
दरम्यान, त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या अमित परदेशी, विनायक म्हेत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनाही नंदू थोरात व इतरांनी मारहाण केली. जखमी अक्षय गवळी याला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक पुढील तपास करत आहेत.



















