लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मंचारमधील कार्यालयात कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : इमारतीच्या बांधकामाचा अंशतः पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी ५ लाखांची लाच मागून त्यातील २ लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुन्नर, आंबेगावचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद पंढरीनाथ शिंदे (वय ४६, रा. डॉ. केतकर लेन, प्रभात रोड, मूळ रा. सोनारी, ता. सिन्नर, जि. नाशिक) याला रंगेहाथ पकडले.
जुन्नर, आंबेगाव विभागाचा उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) म्हणून गोविंद शिंदे कार्यरत आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून, पुणे-नाशिक महामार्गालगत नारायणगाव येथील एका इमारतीच्या अंशतः बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यालयात अर्ज केला होता.
त्यासाठी शिंदे यांनी २० मार्च रोजी तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबतची तक्रार २४ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानंतर शुक्रवारी, २७ मार्च रोजी लाच मागणी प्रकरणाची पडताळणी केली असता तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर दुपारी तीन वाजता गोविंद शिंदे याला तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. शनिवारी गोविंद शिंदे याला खेड येथील विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.




















