आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयात ओएसडी असल्याचा बनाव

Spread the love

पुणे : समर्थ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात व्यवस्थित तपास केला नसल्याचे सांगून, आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात ओएसडी असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीची तोतयागिरी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी उघडकीस आणली. या तोतयाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रद्युम्न श्रीहरी पाटील (वय ४७, रा. लिजंट सोसायटी, हिंजवडी) असे या तोतयाचे नाव आहे. ही घटना परिमंडळ १ पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयात १ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता घडली. याबाबत पोलीस उपायुक्त कार्यालयातील रिडर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील फिर्यादी आगरवाल यांच्या मित्रामार्फत प्रद्युम्न पाटील याची ओळख झाली होती. त्याने आगरवाल यांना आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात ओएसडी असल्याचे सांगितले.

तसेच, पोलिसांच्या मदतीने कोर्टाबाहेर नुकसानभरपाई मिळवून देतो, त्यासाठी १० टक्के रक्कम द्यावी लागेल, असेही त्याने सांगितले होते. प्रद्युम्न पाटील बुधवारी दुपारी साडेचार वाजता पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात आला.

आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात ओएसडी असल्याचे त्याने सांगितले. थेट उपमुख्यमंत्र्यांचा ओएसडी आल्याचे पाहून पोलिसांमध्ये गोंधळ उडाला. त्याने पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांची भेट घेतली आणि समर्थ पोलीस ठाण्यातील या प्रकरणात पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नसल्याचे सांगू लागला.

तसेच, मी अनेकदा मेसेज केले, परंतु उत्तर मिळाले नाही, असेही तो म्हणाला. यामुळे ऋषिकेश रावले यांना संशय आला. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात चौकशी केली असता, असा कोणताही व्यक्ती ओएसडी नसल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर रावले यांनी त्याची चौकशी केली असता त्याची तोतयागिरी उघड झाली. त्यानंतर त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे तपास करीत आहेत.