झाडपडीच्या ८२ घटना : पाणी साचल्याच्या ६ तर भिंत पडल्याची १ घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहराला आज पावसाने अभूतपूर्व तडाखा दिला. या पावसाच्या तडाख्याने पुणेकरांची दाणादाण उडाली. सिंहगड रोडवर एक मोठे झाड कोसळल्याने त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. झाड व भिंत पडून काही ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.
सिंहगड रोड, नवश्या मारुती मंदिरामागे एक झाड पडले असता त्याखाली महिला अडकली असल्याचा कॉल आला. त्याच वेळी सिंहगड रोड अग्निशमन केंद्राची गाडी त्वरित रवाना करण्यात आली.
दलाच्या व तेथील नागरिकांच्या मदतीने या महिलेला बाहेर काढून त्वरित उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
फुल विक्रेत्या रंजना नवनाथ गिरी (वय ६०, रा. दत्तवाडी) असे या महिलेचे नाव आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची सर्व यंत्रणा कार्यान्वित असून २० वाहने, २ रेस्क्यू व्हॅन आणि १०० हून अधिक जवान कार्यरत आहेत.
दुपारी अडीच वाजल्यापासून अग्निशमन दलाला आलेले कॉल : झाडपडीचे कॉल – वानवडी, पुणे विद्यापीठ रोड, बाणेर, चव्हाणनगर, औंध, डीपी रोड, सिंहगड रोड, बिबवेवाडी गंगाधाम, जनता वसाहत, नवीन प्रशासकीय इमारत, काळेपडळ, तरवडे वस्ती, बेटी गावडे रोड, ससाणे नगर, ताडीवाला रोड, कोरेगाव पार्क, महर्षी नगर, धनकवडी, कात्रज, वारजे, वडगाव शेरी, पाषाण या ठिकाणी झाडपडीचे कॉल आले असून त्या ठिकाणी कामे सुरू आहेत. ८२ पैकी ५२ ठिकाणची झाडे व फांद्या बाजूला करण्यात आल्या होत्या.
पाणी शिरणे : वारजे सह्याद्री शाळा, रविवार पेठ, शैलेशबरी पार्क, पाटील प्लाझा या ठिकाणी पाणी शिरल्याचे कॉल आले.
















