लॅप्स झाल्याचे सांगून ते पुन्हा अॅक्टिव्हेट करण्याच्या नावाखाली ४ लाखांना गंडा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रिडिम पॉईंटच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची ३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत एका ४३ वर्षांच्या तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण स्वारगेट भागातील मुकुंदनगर परिसरात राहतो. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्यांनी बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. रिडिम पॉईंट लॅप्स झाले असून ते मिळवून देण्याच्या आमिषाने चोरट्यांनी तरुणाला एक लिंक पाठवली.
“मी सांगेल त्याप्रमाणे प्रक्रिया करावी लागेल,” असे सांगून फोनद्वारे ब्राउझरवर जाऊन टाईप करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी टाईप करताच लिंक ओपन होऊन त्यावर अॅक्सिस बँकेचे पेज उघडले. समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रक्रिया केल्यावर त्यांच्या बँक खात्यातून पैसे कट झाल्याचे मेसेज येऊ लागले. सायबर चोरट्यांनी ३ लाख ९० हजार रुपये लांबवले. या प्रकरणी शाखेचे पोलीस निरीक्षक भारमळ तपास करत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने ५१ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी दोघांची ५१ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी डेक्कन आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्वे रस्ता भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ३७ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत त्या ज्येष्ठाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत कात्रज भागातील एका तरुणाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी १४ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे तपास करत आहेत.



















