अवैध दारू, शस्त्रे आणि अंमली पदार्थांवर पोलिसांचा मोठा दणका
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध शस्त्रे, अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ ही विशेष मोहीम राबवली. २० ते ३१ मार्च या १२ दिवसांत संपूर्ण शहरात व्यापक प्रमाणावर कारवाया करून पोलिसांनी १६६ गुन्हे दाखल करून १३४ आरोपींवर कारवाई केली. ५ लाख ८१ हजार ७८५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
या मोहिमेदरम्यान शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. आर्म्स अॅक्ट अंतर्गत एकूण २९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, अंमली पदार्थांच्या विक्री आणि साठ्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये १३ गुन्हे नोंदवण्यात आले. या कारवायांमुळे गुन्हेगारी नेटवर्कचे कंबरडे मोडले आहे.
अवैध दारू विक्रीवरदेखील पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. ३१ मार्चपर्यंत १६६ गुन्हे दाखल करण्यात आले असून १३४ आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सुमारे ५ लाख ८१ हजार ७८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये २१९९.९ लिटर गावठी दारू, १०८.५८ लिटर विदेशी दारू, ४० लिटर ताडी आणि २० लिटर रसायन जप्त करण्यात आले आहे. यासोबतच १ हजार ३३७ दारूच्या बाटल्या, १५३ गुटखा आणि तंबाखूची पाकिटेदेखील जप्त करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई
रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी उघडपणे दारू पिणाऱ्यांना आणि अशा प्रवृत्तींना खतपाणी घालणाऱ्या अवैध हातगाड्यांवर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत १९५ व्यक्ती व हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली.
अवैध धंद्यांवर कठोर कारवाई
पुणे पोलिस दलामार्फत २० ते ३१ मार्च दरम्यान ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ राबवण्यात आले. १६६ पेक्षा अधिक गुन्हे यामध्ये दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनीही सतर्क राहून त्यांच्या परिसरात अवैध शस्त्रे, अंमली पदार्थ किंवा दारू विक्री होत असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त


















