डॉ. आंबेडकर जयंतीसाठी वर्गणी देण्यासाठी इंजिनिअरला उचलून नेले : ६ जणांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बांधकाम साईटवर येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी मालकाला ५० हजार रुपये वर्गणी देण्यास सांग, असे म्हणून इंजिनिअरला जबरदस्तीने उचलून नेऊन बांधकाम साईटवर २ तास थांबवून ठेवणाऱ्या ६ जणांवर येवलेवाडी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
आकाश गजानन चौधरी (वय २७, रा. साईप्रसाद सोसायटी, चैतन्यनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विनोद चंदर चव्हाण (रा. गोशाळेजवळ, टिळेकरनगर), विजय शिवाजी दुनधव, नवीन सिद्धाम मोटे (रा. टिळेकरनगर), आयेश विजय मकमले (रा. उंड्रीवूड सोसायटी, येवलेवाडी), राहुल नागप्पा उन्नत (रा. म्हसोबा मंदिराजवळ, टिळेकरनगर), समर्थ बाबूराव पांडागळे (रा. टिळेकरनगर, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील टिळेकरनगर येथील प्रचित इटर्निया या बांधकाम साईटवर ३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जैन हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या अशोक जैन अँड असोसिएट्स या फर्ममार्फत कोंढव्यातील टिळेकरनगर येथे प्रचित इटर्निया हा प्रकल्प सुरू आहे. आकाश चौधरी हे बांधकाम साईटवर इंजिनिअर आहेत. ३ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता आरोपी साईटवर आले.
त्यांनी आकाश चौधरी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वर्गणीसाठी मालक अशोक जैन यांना फोन करून ५० हजार रुपये देण्यास सांगितले. मालक साईटवर हजर नसल्याने आरोपींनी त्यांच्या ऑफिसच्या पत्त्याबाबत विचारणा केली. त्यांनी पत्ता सांगितला. त्यानंतर “तू आम्हाला त्यांच्या ऑफिसवर घेऊन चल,” असे म्हणत त्यांनी दबाव टाकला.
चौधरी यांनी विरोध करून त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यावेळी विनोद चव्हाण व विजय दुनधव यांनी त्यांच्या दुचाकीवर जबरदस्तीने पाय टाकून त्यांना उचलून गाडीवर बसवले. त्यांना सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर घेऊन गेले. त्यानंतर त्यांना पुन्हा साईटवर आणून तेथे २ तास थांबवून ठेवले. येवलेवाडी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून ६ जणांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नेवसे तपास करत आहेत.


















